अमित ठाकरे यांच्या विरोधात दाखल झालेल्या FIR मध्ये काय?
Amit Thackeray : पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भिंतीवरील फोटो काढल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात FIR दाखल झाली आहे. बेकायदेशीर जमाव, विनापरवाना प्रवेश आणि धमकीसह विविध कलमांखाली तक्रार करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अमित ठाकरे यांच्या विरोधात दाखल झालेल्या FIR मध्ये काय?
शिवरायांच्या शेजारी मोदींचा फोटो पाहताच अमित ठाकरे आक्रमक
Amit Thackeray : मनसे नेते अमित ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते पुण्यातील महाविद्यालयांना भेटी देत विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते गणेशखिंड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात येथे गेले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महाविद्यालयातील कॅन्टीनमध्ये अस्वच्छता आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत त्यांनी पाहणी केली. त्यानंतर ते संबंधित कार्यालयात गेले. यावेळी कार्यालयातील भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी नरेंद्र मोदींचा फोटो असल्याचे पाहून अमित ठाकरे आक्रमक झाले आणि त्यांनी तो फोटो काढण्यास सांगितले. त्यानंतर मनविसेच्या एका कार्यकर्त्याने नरेंद्र मोदींचा फोटो काढला.
हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधानांचा फोटो, अमित ठाकरेंनी काय केलं?
विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या जमले, FIR मध्ये काय काय?
या घटनेनंतर अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकारी, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महाविद्यालयाशी संबंधित एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार, दुपारी साडेबारा ते सव्वाच्या दरम्यान अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबत 25 ते 25 पदाधिकारी, विद्यार्थी व कार्यकर्ते विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या जमले. त्यानंतर त्यांनी कॉलेजच्या कार्यालयात विनापरवाना प्रवेश केला. कार्यालयात असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून घेतला, तसेच तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कार्यालयात विनाकारण थांबून जोरजोरात घोषणा देत गोंधळ घातल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबत आलेल्या 20 ते 25 अनोळखी पदाधिकारी, विद्यार्थी व कार्यकर्त्यांविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग मंदावला, नवं संकट समोर
