Kiren Rijju, Arjun Ram Meghwal : PM मोदींचा पुन्हा धक्का, दिग्गज मंत्र्याचं खातंच काढलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला आहे. कारण त्यांनी किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून घेतलं आहे. ते खातं त्यांनी अर्जुन मेघवाल यांच्याकडे दिलं आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी आज (18 मे) अचानक आपल्या मंत्रिमंडळात (Cabinet) फार मोठा फेरबदल केला आहे. पंतप्रधान मोदींनी कॅबिनेट मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना कायदा मंत्री पदावरून हटविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल (Arjun Meghwal) यांच्याकडे कायदा मंत्रालय सोपविण्यात आलं आहे. किरेन रिजिजू हे केंद्रीय कायदा मंत्री म्हणून सतत चर्चेत होते आणि त्यांनी यापूर्वी न्यायव्यवस्था आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते. (arjun ram meghwal replaces kiren rijiju as the law minister rijijiu assigned the ministry of earth sciences)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाला मंजुरी दिली आहे. आता किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालयातून काढून त्यांना भू-विज्ञान मंत्रालयात देण्यात आलं आहे. त्याच वेळी, रिजिजू यांच्या जागी, अर्जुन राम मेघवाल यांना त्यांच्याकडे असलेल्या खात्यांव्यतिरिक्त कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार सोपविण्यात आला आहे.
मंत्रालय बदलल्यानंतर रिजिजू काय म्हणाले?
किरेन रिजिजू यांनी ट्विट केले की, ‘माननीय पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री म्हणून काम करणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी CJI DY चंद्रचूड, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्ती आणि सर्व कायदा अधिकार्यांचे आमच्या नागरिकांना कायदेशीर सेवा प्रदान करण्यात मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. मी पंतप्रधान मोदींचा दृष्टीकोन पूर्ण करण्यासाठी उत्सुक आहे. भाजपचा एक कार्यकर्ता या नात्याने मी ज्या उत्साहाने आणि उमेदीने काम केले, त्यादृष्टीने मी भू-विज्ञान मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारणार आहे.’
2021 साली रिजिजू बनले होते कायदा मंत्री
रिजिजू हे अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. किरेन रिजिजू यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1971 रोजी अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. त्यांनी 2004 मध्ये (अरुणाचल पश्चिम मतदारसंघ) पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि जिंकली देखील होती. पण 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला. 2014 च्या निवडणुकीत रिजिजू पुन्हा विजयी झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना गृहराज्यमंत्री बनवण्यात आले होते.










