Baramati Rahuri By-election 2026 Live Blog : सुुरुवातीच्या दोन तासात किती टक्के मतदान? पाहा आकडेवारी
Baramati Rahuri By-election 2026 Live Blog : बारामती आणि राहुरी या महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांसाठी आज (दि.23) मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुुरुवातीच्या दोन तासात किती टक्के मतदान? पाहा आकडेवारी
सूनेत्रा पवार, जय पवारांसह रोहित पवारांनी बजावला मतदानाचा अधिकार
Baramati Rahuri By-election 2026 Live Blog : बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दोन्ही मतदारसंघांत मतदारांचा उत्साह पाहायला मिळत असून सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी समाधानकारक दिसून येत आहे. निवडणूक प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
राहुरी आणि बारामतीमधील मतदानाची आकडेवारी
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत सकाळी 9 वाजेपर्यंत 6.42 टक्के मतदान झाले आहे. राहुरीत पहिल्या दोन तासांत 21 हजार 404 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दुसरीकडे, बारामती पोटनिवडणुकीसाठी सकाळी 7 ते 9 या वेळेत 8.1 टक्के मतदान पार पडले आहे. दोन्ही ठिकाणी सकाळी 10 नंतर मतदारांच्या रांगा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदान केले. त्यांच्यासोबत खासदार पार्थ पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी सर्व नागरिकांना आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय. राजकीय वर्तुळातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी सकाळच्या सत्रातच आपले मतदान पूर्ण केले आहे.
उमेदवारांचे मतदान आणि प्रतिक्रिया
राहुरी पोटनिवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी भुरहानगर येथे मतदान केले, यावेळी ते काहीसे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) उमेदवार गोविंद मोकाटे यांनीही सकाळीच मतदान केले. मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद होत आहे.









