वाहतूक कोंडीमुळे संतापलेल्या 'त्या' महिलेबाबत गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, काय म्हणाले?
Girish Mahajan on that woman who was angry due to traffic jam : ट्रॅफिक जाममुळे संतप्त झालेल्या महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना खडे बोल सुनावले होते. याबाबत त्यांनी आज (दि.22) सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वाहतूक कोंडीमुळे संतापलेल्या 'त्या' महिलेबाबत गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
महिलेची भाषा संसदीय नव्हती, त्यांना पोलिसांकडे तक्रार करता आली असती - महाजन
Girish Mahajan on that woman who was angry due to traffic jam : भारतीय जनता पक्षाकडून मंगळवारी (दि.21) मुंबईत 'नारी शक्ती वंदन' या बिलाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, वाहतूक कोंडीमुळे एका महिलेचा शाळकरी मुलगा अडकला. त्याला घरी घेऊन जाण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे एक महिला चांगलीच संतापली. तिने मोर्चात घुसून सर्वांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 'हा मोर्चा तुम्ही मैदानावर घेऊन जावा. तुम्ही ट्रॅफिक जाम केलंय', असं म्हणत तिने तिचा राग व्यक्त केला. तिने गिरीश महाजन यांना गेट आऊट म्हणत खडेबोल सुनावले. त्यामुळे भाजपच्या मोर्चापेक्षा ही संतप्त महिलाच दिवसभर चर्चेत होती. दरम्यान, या संतप्त महिलेबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले? हे जाऊन घेऊयात..
'त्या' महिलेबाबत गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
गिरीश महाजन म्हणाले, "काल हजारो महिला मुंबई आणि दिल्लीत रस्त्यावर उतरल्या होत्या. काँग्रेसने महिला आरक्षणाच्या विरोधात मतदान केलं, आपल्या मित्र पक्षांनाही विरोधात मतदान करायला लावलं. काँग्रेसने महिला आरक्षणाचं बिल पास होऊ दिलं नाही. त्यामुळे महिलांमध्ये आक्रोष आणि संताप होता. त्यामुळे मोर्चाचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलं होतं. वरळीला सुद्धा अशाच प्रकारे मोर्चा काढण्यात आला. हजारो महिला त्या मोर्चामध्ये होत्या, ट्रॅफिकची कोंडी झाली होती. ते खरं आहे. अनेकदा मोर्चे निघतात, सगळेच पक्ष मोर्चा काढतात. त्यामुळे थोड्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. हे मान्यच करावं लागेल. काल आमचा मोर्चा निघाला त्यावेळी आमच्या एक भगिनी, महिला आल्या. त्यांनी संताप व्यक्त केला. त्या फारच चिडलेल्या होत्या. वाटेल तसं त्या बोलत होत्या. त्यांनी तसं बोलायला नको होतं. त्यांनी रितसर पोलिसांकडे तक्रार द्यायला हवी होती. मी त्या ठिकाणी होतो. तिथेही त्या आल्या. तुम्ही असं कसं करु शकता. तुम्ही रस्ते बंद कसे करु शकतात? मी सांगू शकत नाही, अशा भाषेत त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, "तुम्ही आतमध्ये ग्राऊंडवर जाऊन आंदोलन करा. रस्त्यावर बिलकुल उतरु नका, असं त्या म्हणाल्या. पोलीस त्यांना समजाऊ लागले तर त्या नको त्या भाषेत बोलू लागल्या. त्यामुळे महिला पोलीसही तिथे आल्या होत्या. मात्र, आम्ही संयमाची भूमिका घेतली. त्यांना सांगितलं की, आम्ही 10-15 मिनीटांमध्ये रस्ता क्लिअर करतोय. मात्र, त्या अजिबात ऐकायला तयार नव्हत्या. त्यांनी पाण्याची बाटली उचलून मारली. पोलिसांना आम्ही सांगितलं होतं, त्यांना काही बोलू नका. त्यांना काय बोलायचं असेल ते बोलूद्या, असं आम्ही सांगितलं होतं. त्यानंतर 10-15 मिनीटांमध्ये त्या निघून गेल्या. एवढ्याच त्याठिकाणी प्रकार झालेला आहे. मोर्चा महिलांसाठीच निघाला होता. मात्र, त्यांचा राग फार अनावर झालेला होता. पुढे मोर्चाचे आयोजन करताना आम्ही काळजी घेऊ. मात्र, त्या ज्या भाषेत बोलल्या..ती काय संसदीय भाषा नव्हती. त्यांचा राग वेगळ्या भाषेत मांडू शकल्या असत्या. पोलिसांकडे तक्रार करु शकल्या असत्या. थोडा त्रास लोकांना देखील झालाय. मात्र, तो प्रत्येक मोर्चामध्ये थोडाफार होत असतो. हेही खरं आहे. मात्र, एखादी भगिनी आमच्या मोर्चावर बाटली फेकून मारते. अशा पद्धतीने बोलते, हे देखील योग्य नाही."
इतर महत्त्वाच्या बातम्या









