काय डोंगर, काय झाडी.. काय हॉटेल एकदम ओके! गुवाहाटीच्या 'त्याच' हॉटेलमध्ये नगरसेवक
उल्हासनगरच्या नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा हा सध्या वादात सापडला आहे. कारण पालिकेच्या तिजोरीतून तब्बल 65 लाखांचा खर्च करण्यात आलेल्या या दौऱ्यात नगरसेवकांचे कुटुंबीय देखील सोबत असल्याने या दौऱ्याबाबत आता अनेक स्तरातून टीका केली जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
उल्हासनगरच्या नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा वादाच्या भोवऱ्यात
नगरसेवकांसोबत कुटुंबीय आणि नातेवाईकही, त्यांच्या खर्चावरून रंगला वाद
शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगेही विमानात असल्याचा व्हिडिओ व्हायरल
उल्हासनगर: उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गुवाहाटी येथील प्रशिक्षण दौऱ्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हा दौरा प्रशिक्षणासाठी होता की पिकनिक, असा प्रश्न उपस्थित केला जात असून पालिकेच्या तिजोरीतून तब्बल 65 लाख रुपये खर्च झाल्याची चर्चा रंगली आहे.
नगरसेवकांसोबत त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनीही प्रवास केल्याचा आरोप होत असल्याने या दौऱ्याभोवती वादाचे सावट निर्माण झाले आहे. तसेच या दौऱ्यात जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे सुद्धा होते, त्यांच्या या दौऱ्यात काय काम होतं? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहे. या अभ्यास दौऱ्यातून नगरसेवक उल्हासनगरमध्ये नेमकं काय करणार? असेही प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत.
गुवाहाटी दौऱ्यावरून नगरसेवकांवर टीका
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने 22 ते 26 जुलै दरम्यान गुवाहाटी येथे नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. 76 पैकी 71 नगरसेवकांनी या प्रशिक्षणासाठी संमती दिल्यानंतर त्यांच्या प्रवास आणि निवासाचा संपूर्ण खर्च उल्हासनगर महापालिकेने उचलला. मात्र, प्रत्येक नगरसेवकांसाठी विमान प्रवास, पंचतारांकित हॉटेलमधील निवास, भोजन, स्थानिक प्रवास, प्रकल्प भेटी, सभागृह आणि इतर सुविधांसह सुमारे 74 हजार 720 रुपयांचा खर्च अपेक्षित होता. दरम्यान, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये अनेक नगरसेवक पत्नी, आई, मुले आणि इतर नातेवाईकांसह गुवाहाटी गाठल्याचा आरोप होत आहे.
हे ही वाचा>> विरोधी पक्षांना यश येत नाही, मग सीजेपीच्या आंदोलनालाच यश का आलं? अभिजीत दिपकेंचं उत्तर ऐकाच
उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेना नेहमी एकमेकांचा विरोधात भांडत असतात मात्र, या गुवाहाटी दौऱ्यात दोन्ही पक्ष एकत्र आले. आता या अभ्यास दौऱ्याचा उल्हासनगरवासियांसाठी कशा पद्धतीने उपयोग करतात? तसेच ह्याचा फायदा शहरात कसा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, या संपूर्ण प्रकरणामुळे पालिकेच्या निधीचा वापर, प्रशिक्षण दौऱ्याची पारदर्शकता आणि नगरसेवकांसोबत गेलेल्या कुटुंबीयांच्या खर्चाचा तपशील जाहीर करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
