कर्नाटकात पराभव झाला, तर 2024 मध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग कठीण! कारण…
कर्नाटकच्या राजकारणापुरते मर्यादित नसून 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही ही निवडणूक महत्त्वाची मानले जात आहे. कर्नाटक निवडणूक निकालांचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीशी संबंध जोडला जात आहे.
ADVERTISEMENT

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या म्हणजेच शनिवारी (13 मे) लागणार आहेत, मात्र त्याआधी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची (BJP) चिंता वाढवली आहे. एक्झिट पोलच्या निकालात भाजपचा पराभव आणि काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला सर्वाधिक 122 ते 140 जागा मिळू शकतात तर भाजपला 62 ते 80 जागा मिळू शकतात. त्याचवेळी एक्झिट पोलमध्ये जेडीएसला 20 ते 25 जागा आणि इतरांना शून्य ते तीन जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीकडे साधारण निवडणूक म्हणून बघितलं जाऊ शकत नाही. पुढील पाच वर्षे राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार, हे या निवडणुकीतून कळणार नाही. या निवडणुकीचे राजकीय महत्त्व केवळ कर्नाटकच्या राजकारणापुरते मर्यादित नसून 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही ही निवडणूक महत्त्वाची मानले जात आहे. कर्नाटक निवडणूक निकालांचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीशी संबंध जोडला जात आहे.
2024 मध्ये भाजपसाठी काय अडचणी असतील?
विशेष म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या दृष्टिकोनातूनही कर्नाटकची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची ठरते. एक्झिट पोलचे अंदाज निकालात बदलले, तर भाजप सत्तेतून बाहेर पडेल. कर्नाटक निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आपले लक्ष्य गाठणे कठीणच नाही तर अशक्य होईल, असे बोलले जात आहे.
कर्नाटकात जागा कमी होऊ शकतात?
जर भाजप निवडणूक हरला तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात पक्षाच्या जागा कमी होऊ शकतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, राज्यातील 28 जागांपैकी भाजपने 25 जागा जिंकल्या आणि त्यांच्या समर्थित अपक्ष उमेदवारांनी एक जागा जिंकली तर काँग्रेस-जेडीएसला प्रत्येकी एक जागा मिळाली. कर्नाटकात भाजपचा पराभव झाल्यास राज्यात 2019 च्या निकालाची पुनरावृत्ती करणे पक्षाला कठीण होऊन काँग्रेसच्या जागा वाढू शकतात.