'विद्यार्थिनी रात्री 12.30 वाजता कॅम्पसच्या बाहेर कशी गेली?..' अत्याचार प्रकरणात ममता बॅनर्जींचा कॉलेज प्रशासनाला सवाल
mamata banerjee : 'मुलींनी रात्री घराबाहेर नाही पडलं पाहिजे...', दुर्गापूर अत्याचार प्रकरणात ममता बॅनर्जी यांचं वक्तव्य
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

'मुलींनी रात्री घराबाहेर नाही पडलं पाहिजे...'

दुर्गापूर अत्याचार प्रकरणात ममता बॅनर्जी यांचं वक्तव्य
mamata banerjee : पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ममता यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी खासगी कॉलेजवर टाकत विचारले – “ती विद्यार्थिनी रात्री 12.30 वाजता कॉलेजच्या परिसरातून बाहेर कशी गेली?” त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपाने आरोप केला आहे की, मुख्यमंत्री पीडितेलाच दोष देत आहेत.
ममता बॅनर्जींकडून “नाईट कल्चर”वर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही घटना “धक्कादायक” असल्याचे सांगितले आणि पोलिस सर्व आवश्यक पावले उचलत असल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यांनी असेही म्हटले की, “ती एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होती. जबाबदारी कोणाची आहे? ती रात्री 12.30 वाजता बाहेर कशी गेली?” ममतांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना आपल्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आणि “नाईट कल्चर”वर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी पुढे म्हटले, “त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नसावी. तो परिसर जंगलासारखा आहे.”
ओडिशाचा दाखला देत विरोधकांवर पलटवार
भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ममता बॅनर्जी यांनी शेजारच्या ओडिशा राज्याचा दाखला दिला. त्यांनी म्हटले, “ओडिशामध्ये समुद्रकिनाऱ्यावर मुलींवर बलात्कार झाले. ओडिशा सरकारने काय कारवाई केली?” ममतांनी स्पष्ट केले की दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल. “अशा घटना जिथेही घडतात, त्यांची निंदा केली पाहिजे. मणिपूर, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशा येथेही अनेक प्रकरणे घडली आहेत. आम्ही कठोर कारवाई करू.”
“ममतांनी पीडितेलाच दोष दिला”, भाजपची टीका
भाजपाने ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी एक्स (X) वर लिहिले, “@MamataOfficial – स्वतः महिला असूनही पीडितेवरच दोषारोप करत आहेत. न्याय देण्याऐवजी पीडितेलाच दोषी ठरवले जात आहे.” भाजपाने म्हटले की, “ज्या मुख्यमंत्री स्वतः मुलींना रात्री बाहेर न जाण्याचा सल्ला देतात पण सुरक्षित ठेऊ शकत नाहीत, त्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.”