Kamal Gavai: 'त्या' हल्ल्यानंतर सरन्यायाधीशांची आई शांतपणे फक्त एवढंच म्हणाल्या, 'हे वागणं म्हणजे...'
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोर याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यावर सरन्यायाधीशांच्या आई डॉ. कमल गवई यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. पाहा त्या नेमकं काय म्हणाल्या.
ADVERTISEMENT

मुंबई: भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर कोर्टात झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नावर आता त्यांच्या आई डॉ. कमल गवई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी या घटनेचा कठोर निषेध केला असून, भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर भर दिला आहे. त्यांनी असे वर्तन अनुचित असून, ते देशाच्या लोकशाही मूल्यांना धोक्यात घालू शकते, असे म्हटले आहे.
डॉ. कमल गवई यांनी म्हटले की, "मी सरन्यायाधीश यांच्यावर बूट फेकण्याच्या जो प्रयत्न झाला त्या घटनेचा मी निषेध करते. भारतीय राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसमावेशक ठेवून जनतेला सुपूर्द केली आहे. भारतीय संविधान हे सर्वांना समान संधी देतं. पण काही लोक कायदा हातात घेऊन असं वागतात की, त्यांचं हे वागणं भारतासाठी लज्जास्पद आहे. यामुळे देशात अराजकता पसरू शकते. हे असं काही करण्याचा देशातील कोणालाही अधिकार नाही. मी सगळ्यांना निवेदन करेन की, आपले जे प्रश्न आहेत, जे आपल्याला म्हणायचं आहे ते सनदशीर मार्गाने आणि शांततेने मांडा. असी मी सगळ्यांना विनंती करते. सगळ्यांचं मंगल होवो. " त्यांनी पुढे सांगितले की, असे वर्तन केवळ व्यक्तीच्याच नव्हे, तर देशाच्या संपूर्ण न्यायव्यवस्थेवरही परिणाम करू शकते.
घटनेची पार्श्वभूमी
या घटनेची पार्श्वभूमी अशी की, वकील राकेश किशोर याने मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर देशभरातून निषेधाचे स्वर उमटले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या हल्ल्याचा निषेध केला. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लिहिले की, "मुख्य न्यायमूर्तींवर झालेला हल्ला प्रत्येक भारतीयाला चीड आणणारा आहे. अशा लज्जास्पद कृत्यांना समाजात स्थान नाही." त्यांनी मुख्य न्यायमूर्तींच्या शांततेने वागण्याचेही कौतुक केले.
हे ही वाचा>> भूषण गवईंनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आणि दुसऱ्याच दिवशी राणेंना दिला झटका, पुण्यातील 'ते' प्रकरण काय?
डॉ. कमल गवई यांचे योगदान
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई डॉ. कमल गवई यांचे सामाजिक कार्य आणि त्यांचे विचार नेहमीच देशभरात गौरवले गेले आहेत. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, त्यांच्या विधानातून त्यांनी शांततेने प्रश्न मांडण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यांच्या या विधानाने या घटनेच्या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक संदेश दिला असून, देशाच्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.