पंढरपुरातील आंदोलनावेळी Rohit Pawar यांचा परिवार भावूक, पत्नी कुंती यांच्यासह मुलंही रडली
Rohit Pawar Farmer Protest Pandharpur Update : आमदार रोहित पवार यांच्या कुटुंबियांनी आंदोलनस्थळी त्यांची भेट घेतली.यावेळी रोहित पवारांच्या पत्नी-मुलांना अश्रू अनावर झाले. पत्नी कुंती पवार मुलांसह रोहित पवार उपोषण करत असलेल्या स्टेजवर आल्या होत्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पंढरपुरातील आंदोलनावेळी Rohit Pawar यांचा परिवार भावूक
पत्नी कुंती यांच्यासह मुलंही रडली
Rohit Pawar Farmer Protest Pandharpur Update : शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावरुन आमदार रोहित पवार पंढरपुरात उपोषणाला बसलेले असताना त्यांच्या कुटुंबियांनी रविवारी (दि.14 आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यावेळी रोहित पवारांच्या पत्नी-मुलांना अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. पत्नी कुंती पवार मुलांसह रोहित पवार उपोषण करत असलेल्या स्टेजवर आल्या. स्टेजवर येताच मुलांना अश्रू अनावर झाले. पत्नी कुंती पवारही भावूक झाल्या. रोहित पवारही भावूक झाले होते. अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करत रोहित पवार सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. मात्र, सरकारने आश्वासन दिल्यानंतर त्यांनी तिसऱ्या दिवशी उपोषण सोडलं.
हेही वाचा : सांगली : 13 वर्षीय मुलावर गोळ्या झाडल्या, आरोपी मैत्रिणीसोबत लॉजवर सापडला!
उपोषण सोडल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट, जशीच्या तशी
सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचं नाव दिलं परंतु अटीशर्ती टाकल्यामुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार होते आणि हा एकप्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचाही अवमान आहे, ही गोष्ट पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु करुन आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर सुरवातीला अटीशर्ती नाकारणारं सरकार आता या अटीशर्ती काढण्याबाबत तयार झालं, हे या आंदोलनाचं यश आहे.
मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी पंढरपुरात आंदोलन स्थळी भेट देऊन इथूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशीही संपर्क साधून चर्चा केली आणि येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी म्हणजेच २२ जूनपूर्वी मुंबईत बैठक घेऊन कर्जमाफीतील या जाचक अटीशर्ती काढून टाकण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळं गेले तीन दिवस सुरु असलेलं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं. महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या नामदेव पायरीवर माझ्यासोबतचे सर्व उपोषणकर्ते, वारकरी, शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सर्वांच्या उपस्थितीत महाआरती करुन उपोषणाची औपचारीक सांगता करण्यात आली.









