विलीनीकरणाला विरोध, चर्चा फेटाळून लावत रोहित पवार जे म्हणाले ते ऐकाच!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावरून रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नसल्याचं सांगत त्यांनी विलीनीकरणामागील अजित पवार यांची भूमिका स्पष्ट केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला विरोध
चर्चा फेटाळून लावत रोहित पवार जे म्हणाले ते ऐकाच!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. फेब्रुवारी महिन्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार होते, मात्र अजित पवार यांच्या निधनामुळे ही प्रक्रिया होऊ शकली नाही, असं विधान खासदार सुनील तटकरे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना रोहित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं स्पष्ट केलं. अजित पवार यांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी, अशी इच्छा होती. पवार कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे, या भावनेतून त्यांनी विलीनीकरणाची भूमिका घेतली होती, असं रोहित पवार म्हणाले. मात्र, या भावनिक भूमिकेचा राजकीय अर्थ लावू नये, असंही त्यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट झालं. ते यवतमाळमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
भाजपने विद्यार्थी, तरुण, महिला, शेतकरी आणि शेतमजुरांवर अन्याय केल्याचा आरोप
रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजितदादांना पाहून माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते घडले आहेत. शरद पवार यांनी गेल्या 60 ते 65 वर्षांपासून प्रतिगामी विचारांविरोधात लढा दिला आहे. त्यामुळे आज अजितदादांचा पक्ष सत्तेत असताना त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. अजितदादा आणि शरद पवार असताना असा कोणताही निर्णय घेतला जाणार नव्हता, असंही त्यांनी सांगितलं. दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र आल्यास तुम्ही सोबत जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी भाजपविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपने विद्यार्थी, तरुण, महिला, शेतकरी आणि शेतमजुरांवर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला. संविधानावर विश्वास ठेवणारे लोक म्हणून संविधानाला धोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार यांच्या विलीनीकरणाच्या भूमिकेबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांचं वय लक्षात घेता आणि अजितदादा स्वतः तसेच संपूर्ण कुटुंब एकत्र राहावं, या भावनेतून त्यांनी विलीनीकरणाची इच्छा व्यक्त केली होती. ही त्यांची भावनिक भूमिका होती. अजितदादा सत्तेत राहणार होते की नाही, याबाबत त्यांनाच माहिती होती. मात्र, त्यांच्या निधनापूर्वी झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अजितदादांनी भाजपच्या विरोधात लढा दिला होता, असंही रोहित पवार यांनी सांगितलं. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चेचा संदर्भ देताना अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याबाबत वेगवेगळी वक्तव्यं समोर येत असताना रोहित पवार यांनी भाजपसोबत जाण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळली आहे.
रोहित पवारांकडून सुनील तटकरेंना जुन्या स्टेटमेंटची आठवण
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यांवरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. अजित पवार यांच्या निधनानंतर दहा दिवसही झाले नव्हते, त्यावेळी विलीनीकरणाबाबत अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती, असं तटकरे म्हणाले होते. मात्र, आता तेच विलीनीकरण होणार होतं, असं सांगत आहेत. मग अचानक त्यांच्या भूमिकेत बदल का झाला, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. या वक्तव्यामागे काही राजकीय भूमिका असू शकते, असंही ते म्हणाले. संबंधित नेत्यांना त्यांच्या पक्षात काही अडचणी येत असाव्यात आणि त्यातूनच त्यांनी हे वक्तव्य केलं असावं, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सध्या आपण विदर्भात शेतकरी आणि शेतमजुरांना भेटण्यासाठी आलो असून, त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करत आहोत. त्यानंतर मराठवाड्यात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपण समाजकारण करत असून, इतर राजकीय नेते काय राजकारण करत आहेत, हे त्यांनाच माहिती, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.
