समजून घ्या: अभिजीत दीपकेंचं राजकीय कनेक्शन काय? अचानक फॉलोअर्स का गेले विरोधात?
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंचं राजकीय कनेक्शन समोर आल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे. जाणून घ्या याबाबत सविस्तर.
ADVERTISEMENT

मुंबई: सोशल मीडियावर प्रंचड धुमाकूळ घालणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे कनेक्शन आम आदमी पक्षासोबत जोडलं जातं आहे. CJP पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी याआधी आप पक्षासोबत काम पण केलं आहे, आप पक्षाला दिल्ली गमावल्यानंतर एकमेव सत्ता असलेलं पंजाब राज्य वाचवणं अतिशय गरजेचं आहे. भाजपने आपचे 7 खासदार फोडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनाही मास्टरस्ट्रोक मारणं गरजेचं आहे. कुठेतरी सीजेआय यांच्या रिमार्कची संधी साधत या कॉक्रोच जनता पक्षाची निर्मिती होते आहे का? अभिजीत दीपके आणि आम आदमी पक्षाचं कनेक्शन नेमकं काय होतं समजून घेऊया.
कोणत्याही पक्षाला निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं असेल तर आधी त्या पक्षाची नोंदणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करावी लागते. त्यानंतरच तुम्हाला निवडणुकीत लढण्यासाठी चिन्हं मिळतं. मात्र अभिजीत दीपके यांनी अजून तरी असा कोणता निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे केवळ सोशल मीडियावर अकाऊंट्सने वातावरणनिर्मितीच होऊ शकते.
हे ही वाचा>> समजून घ्या: रूपया आपटला, EMI घेतलेल्यांची आता पार लागणार वाट?
आता ही वातावरणनिर्मिती होताना दीपके किंवा सीजेपीच्या अधिकृत हँडल्सवरून भाजपविरोधातच पोस्ट टाकलेल्या पाहायला मिळत आहेत, मग ही वातावरणनिर्मिती भाजपविरोधात करून कोणत्या एका विशिष्ट पक्षाला फायदा पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे का असा सूर सोशल मीडियावरच पाहायला मिळतो आहे. भाजपविरोधातल्या पक्षाचा फायदा म्हटल्यावर आपल्या समोर विरोधी पक्षांमधल्या अनेक पक्षांची नावं येतील. पण मग इथे अभिजीत यांची आम आदमी पक्षाची पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी.
कॉक्रोच जनता पार्टीच्या संस्थापकाची नेमकी पार्श्वभूमी काय?
योगायोगाने दीपकेंची आताची चळवळ ही सोशल मीडियावर सुरू आहे आणि आम आदमी पक्षामध्येही त्यांनी पक्षाच्या सोशल मीडियासाठीच काम केलेलं. सोशल मीडिया आणि निवडणुकीच्या प्रचाराचं काम दीपके पाहायचे. 2020 ते 2023 दीपके आम आदमी पक्षासोबत काम करत होते. आम आदमी पक्षाचं दिल्लीमध्ये सरकार असताना आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करण्यावर सगळ्यात जास्त भर असायचा. फार क्वचित असे पक्ष आहेत जे आरोग्य-शिक्षण या विषयावर जोर देतात त्यामुळे त्यावर प्रभावित होऊन आपण आप पक्षासोबत काम करत होतो हे स्वत: अभिजीत दीपकेंनीच सांगितलं आहे.









