Sharad Pawar Interview: अजितदादांच्या बंडानंतर शरद पवारांची Mega Exclusive मुलाखत जशीच्या तशी
Sharad Pawar Mumbai Tak Interview: अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केल्यानंतर शरद पवारांच्या नेमक्या भावना काय?, वाचा मुंबई Tak वरील शरद पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
ADVERTISEMENT
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत (BJP) जाण्याचा निर्णय अंमलात आणल्याने पक्षात मोठी फूट पडली. त्यानंतर अजित पवारांनी लागलीच शरद पवारांवर (Sharad Pawar) टीकाही केली, त्यांच्यासोबतच्या अनेकांनी तशाच स्वरुपाचं भाष्य केलं. मात्र, या सगळ्यात आपण मागे हटणार नाही. महाराष्ट्र पिंजून काढू अन् पक्षाला नवी ताकद देऊ असा एल्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पण असं असताना वयाच्या 83 व्या वर्षी त्यांच्यासमोर प्रचंड आव्हानं आहेत. त्या आव्हानांना पवार कसं तोंड देणार.. आपल्या विरोधकांवर कशी मात करणार या सगळ्याबाबत स्वत: शरद पवार यांनी अतिशय रोखठोकपणे उत्तरं दिली आहेत. (sharad pawar mumbai tak exclusive interview after ajit pawar rebelled ncp sahil joshi latest political news maharashtra)
मुंबई Tak चे (Mumbai Tak) व्यवस्थापकीय संपादक साहिल जोशी (Sahil Joshi) यांनी आज (8 जुलै) शरद पवार यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. या मुलाखतीत पवारांनी अजित पवारांपासून भुजबळ आणि प्रफुल पटेलांचा चांगलाच समाचार घेतला. वाचा शरद पवार यांची हीच एक्सक्लुझिव्ह मुलाखत जशीच्या तशी..
शरद पवारांची Mega Exclusive मुलाखत जशीच्या तशी:
साहिल जोशी: छगन भुजबळांच्या मतदारसंघातून तुमची यात्रा सुरू होणार आहे. तुम्ही लोकांना काय सांगणार आहात?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
शरद पवार: मी नाशिक जिल्ह्यात जाणार आहे. येवला हा नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. नाशिक जिल्ह्याची ही खासियत आहे की, हा जिल्हा काँग्रेस विचाराचं समर्थन करणारा जिल्हा आहे. एकेकाळी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं अधिवेशन देखील झालं होतं. जेव्हा पंडीत जवाहरलाल नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्री म्हणून आपल्या मंत्रिमंडळात घेतलं तेव्हा याच नाशिक जिल्ह्याने चव्हाण साहेबांना बिनविरोध संसदेत पाठवलं. यामुळेच हा एक वेगळा जिल्हा आहे जिथे आमचं भावनिक नातं आहे.
एकदा असंच झालं की, माझ्या नेतृत्वात माझ पक्ष लढत होता. सगळ्याविरोधात.. किंबहुना काँग्रेसविरोधातही.. तेव्हा नाशिक जिल्ह्याने मला सर्व जागा माझ्या पारड्यात टाकल्या होत्या. त्यामुळे मला आनंद वाटतो की, हा एक असा जिल्हा आहे की, चांगल्या कामासाठी नेहमीच समर्थन देतं. यामुळे नाशिक जिल्ह्यात आपण जायला हवं, कोणत्या तरी मतदारसंघात जायला हवं.. त्यासाठी मी हा मतदारसंघ निवडला. हा जो मतदारसंघ आहे तिथे भुजबळ आमदार आहेत. पण भुजबळ हे नाशिकच्या राजकारणात येण्याआधी येवला हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस एस ज्याचा मी अध्यक्ष होतो.. तो आमच्याकडे होता. साहजिकच आम्हाला समर्थन देणारा हा मतदारसंघ आहे.
जेव्हा भुजबळ साहेब मुंबईतून निवडून जाऊ शकत नव्हते.. त्यांच्यासाठी स्थिती योग्य नव्हती तेव्हा आम्ही ठरवलं की, त्यांच्यासाठी एक सुरक्षित मतदारसंघ आपण कुठून देऊ शकतो.. तर तो सुरक्षित मतदारसंघ हा येवला आहे. पक्षाने त्यांना हा मतदारसंघ दिला आणि त्यांनी देखील हाच मतदारसंघ मागितला होता. तिथून ते निवडूनही आले.
आज मी सुरुवात यासाठी करत आहे की, जेव्हा एक समस्या निर्माण होते राजकीय.. तेव्हा असे मतदारसंघ जे तुम्हाला समर्थन देतात ज्यामध्ये येवला आहे.. त्यामुळे आम्ही येवल्यापासून सुरुवात करत आहोत.
साहिल जोशी: आज आपल्यावर सर्वाधिक हल्ला कोण चढवत असेल तर ते छगन भुजबळ आहेत. ते म्हणतात आपण जे पेरलं आहे तेच आता उगवतंय.. आपण अनेकदा यू-टर्न घेतले आहेत राजकारणात त्यामुळे आज आपल्याला हे पाहावं लागतंय.
शरद पवार: हे यू-टर्न.. वैगरे यात काही दम नाही.. कोणत्याही राजकीय पक्षात काही अडचण असतील तर त्यात चर्चा होते. चर्चेमध्ये वेगवेगळे मुद्दे मांडले जातात. पण सर्वांशी चर्चा केल्यानंतर अंतिम गोष्ट ठरवली जाते. जेव्हा वेगवेगळी मतं येतात.. तेव्हा जर कोणी एक मत माडलं आणि नंतर सर्वसंमतीने दुसरा निर्णय झाला तर तो यू-टर्न असू शकत नाही. ही निर्णय घेण्याची एक प्रक्रिया असते. आणि माझी नेहमी हीच पद्धत राहिली आहे.
मी हे सांगू इच्छितो की, जे-जे निर्णय झाले त्यामध्ये या लोकांचा समावेश होता की नाही?
जसं की आपण प्रफुल पटेलांचा नाव घेतलं, त्यांनी असं म्हटलं की, नियुक्ती अनधिकृत आहे.. माझी नियुक्तीची निवडणूक ही दिल्लीत बैठक झाली.. दिल्लीतील बैठकीत म्हणजे तालकटोरामध्ये हजारो लोकं होती. त्या सगळ्यांच्या समोर निवडणूक झाली. बिनविरोध ही बैठक झाली.. याबाबतचा जो प्रस्ताव होता तो स्वत: प्रफुल पटेल यांनी ठेवला होता. यानंतर नव्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर, पदाधिकाऱ्यांच्या नेमकणुकीचा अधिकार त्याच अधिवेशनात मला देण्यात आला. हा अधिकार दिल्यानंतर ज्यांची नियुक्ती करण्यात आली त्या सर्व नियुक्ती प्रफुल पटेल यांच्या पत्राने झाल्या. पक्षाचे सरचिटणीस या नात्याने..
हे सगळे जे निर्णय त्यांनी घेत ते काय घटनाबाह्य आहेत? कोणी केलं.. हे तुम्हीच केलं नाही. तुम्हाला परवानगी मी दिली होती ही गोष्ट खरी आहे.. तेव्हा ही गोष्ट घटनात्मक होती.. तर मग आज काय झालं असं?
साहिल जोशी: त्यांचं म्हणणे की, भाजपसोबत आपण तीनदा बातचीत केली, तुमच्या सांगण्यानुसार ते बातचीत करण्यासाठी गेले, त्यानंतर आपण अचानक निर्णय बदलले ज्यामुळे त्यांना मानहानी सहन करावी लागले. असं त्यांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
शरद पवार: बातचीत करणं.. राजकारणात राजकीय गोष्टींवर चर्चा होतात. चर्चा करावी देखील लागते लोकांची मतं लक्षात घेऊन. ही चर्चा अनेकदा झाली.. फक्त भाजपच नव्हे तर काँग्रेससोबत देखील झाली. पण अल्टिमेटली अंतिम निर्णय काय झाला?, अंतिम निर्णय त्याबाबत झालाच नाही. काँग्रेससोबत झाला, भाजपसोबत कधीही झाला नाही. तिसरी गोष्ट ही आहे की, चर्चा करणं आणि जो पक्षाविरोधात आम्ही निवडणूक लढवली, विचारधारा वेगवेगळी आहे. त्या लोकांसोबत जाऊन आणि सत्तेत सामील होणं यात काही फरक आहे की नाही?
हे जे म्हणतात की, आम्ही चर्चा केली.. चर्चा केलीच पाहिजे.. राजकारणात राजकीय चर्चा करूनच निर्णय घेण्याची प्रक्रिया पार पडली पाहिजे. तीच खरी लोकशाही प्रक्रिया आहे. पण पक्षाची लाइन सोडून आपण दुसऱ्या पक्षासोबत त्यांना समर्थन देतात जो पक्ष.. ज्यांच्या विरोधात आपण निवडणूक लढले आणि जिंकले.. यामुळे ते जे म्हणतात त्या त्यांच्या बोलण्यात काहीही दम नाही.
साहिल जोशी: अजित पवार म्हणतात की, जर आपण शिवसेनेसोबत युती करु शकतात तर मग भाजपसोबत युती करणं काय चुकीचं? शिवसेनेसोबत गेल्याने तुमचं सेक्युलररिझम संपलंयत तर मग भाजपसोबत का नाही?
ADVERTISEMENT
शरद पवार: फरक खूप आहे.. शिवसेनेसोबत आजच गेलोय असं नाही.. जेव्हा आणीबाणी होती तेव्हा संपूर्ण देशात इंदिरा गांधी ज्या काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्याविरोधात वातावरण होतं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे एकटेच असे राजकीय नेते होते की, ज्यांनी इंदिरा गांधींच्या या निर्णयाला समर्थन दिलं होतं. फक्त समर्थन दिलं नव्हतं. समर्थन तर दिलंच.. पण जेव्हा निवडणूक आल्या तेव्हा इंदिराजींना मदत करण्यासाठी बाळासाहेबांनी संपूर्ण राज्यात एकही उमेदवार उभा केला नव्हता. आणि त्यांना समर्थन दिलं. शिवसेनेची स्थापना ज्यांच्या विचारांनी, ज्यांच्या नेतृत्वात झाली त्या बाळासाहेबांनी हा निर्णय घेतला होता.
आज अशी स्थिती आली की, आपण सोबत काम करण्याची आवश्यकता आहे. तर काँग्रेस, बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष म्हणजेच उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि राष्ट्रवादी तिघांनी मिळून काही पावलं उचलली आणि कार्यक्रम निश्चित केला. त्यामुळे शिवसेनेसोबत जाणं आणि भाजपसोबत जाणं यात जमीन-आस्मानचा फरक आहे.
साहिल जोशी: ते म्हणतात की, आपण आपली धर्मनिरपेक्षता सोडली.. कारण शिवसेना हा देखील हिंदुत्ववादी पक्ष आणि भाजप देखील.
शरद पवार: असतील.. भाजप आणि शिवसेनेमध्ये बराच फरक आहे.. खूपच अंतर आहे..
साहिल जोशी: त्यांच्या हिंदुत्ववादात देखील अंतर आहे?
शरद पवार: कसला हिंदुत्ववाद.. हा सगळा लोकांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा मामला आहे.. दुसरं काही नाही..
साहिल जोशी: एवढ्या वर्षानंतर अजित पवार पहिल्यांदा तुमच्याविरोधात बोलताना दिसले. त्यांनी सरळ सांगितलं की, तुम्ही वंशवादाला खतपाणी घालता, ते तुमचे पुत्र नाहीत म्हणून त्यांना संधी मिळाली नाही. हे उत्तराधिकारी निवडल्यामुळे घडलंय?
शरद पवार: मी याबाबत काही जास्त बोलू इच्छित नाही.. कुटुंबाबाबतचे जे मुद्दे आहेत त्याविषयी मला जास्त बोलायचं नाही. ते मला आवडतही नाही. फक्त एकच गोष्ट मी आपल्या निर्दशनास आणू इच्छितो की, अजित पवार यांना सुरुवातीला राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली. त्यानंतर कॅबिनेट मंत्रिपद दिलं. तीन ते चार वेळा उपमुख्यमंत्री म्हणून पक्षाने त्यांना संधी दिली.
ते बोलतात सुप्रियाबाबत.. ही तुलना बघा की.. एकाला तीन ते चार वेळा उपमुख्यमंत्री आणि एकदा मंत्रिपद.. आणि दुसऱ्याला एकही असं महत्त्वाचं पद दिलं नाही.
भारत सरकारमध्ये जेव्हा मंत्री बनविण्याची संधी राष्ट्रवादीला मिळाली तेव्हा सूर्यकांता पाटील यांना संधी दिली. त्यावेळी सुप्रिया ही खासदार होती. दुसऱ्या वेळी संधी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसला तेव्हा आमचे संगमा यांच्या मुलीला संधी दिली.. तेव्हाही सुप्रिया संसदेत होती. आणि तिसऱ्या वेळी प्रफुल पटेल यांना संधी दिली पण सुप्रियाला मंत्री बनवलं नाही.
प्रफुल पटेलांची मंत्रिमंडळात तेव्हा एंट्री झाली होती जेव्हा की, ते लोकसभा निवडणुकीत हरले होते. पण जेव्हा सुप्रिया सुळे या संसदेत असताना देखील मी इतर लोकांना संधी दिली होती.
हे ही वाचा >> ‘सटर-फटर लोकांमुळे..’, ठाकरे गट सोडताच नीलम गोऱ्हेंनी सुषमा अंधारेवर केली टीका
साहिल जोशी: आपल्यावर अचानक हे आरोप का लावले जात आहेत?
शरद पवार: एक सरळ गोष्ट आहे की.. भाजपसोबत जायचं होतं. हे सगळं जे काही बनतं आहे.. जे काही अॅक्शन घेत आहेत त्याचा गेम प्लॅन हा भाजपच्या हेडक्वॉर्टरमधून तयार झाला आहे. ते जसं सांगतायेत तसं आमचे सहकारी करत आहेत. यापेक्षा जास्त दुसरी कोणतीही बाब नाही..
साहिल जोशी: ते तर सांगत आहेत की, आपण 83 वर्षाचे झाले आहेत आपण थांबलं पाहिजे..
शरद पवार: मी काम करू शकतो.. काम करण्याची उमेद आहे.. माझी ताकद आहे. मी ठरवलं होतं की, मी निवृत्त व्हावं.. पण तेव्हा संपूर्ण पक्षाने माझ्यावर दबाव आणला की, आपण आपला निर्णय मागे घ्या. पण संपूर्ण पक्ष.. म्हणजे जिल्ह्यात, तालुक्यात.. लोकं रडायला लागले. एवढा दबाव माझ्यावर टाकला आणि ते मला म्हणाले की, तुम्ही अध्यक्ष पद सोडू नका.. अखेर मला लोकांचं म्हणणं मानावं लागलं आणि मी कामाला सुरुवात केली.
आज मला कोणी सांगतं की, तुम्ही रिटायर व्हा.. एकीकडे संपूर्ण पक्ष म्हणतोय की, तुम्ही काम करा तर मग मी का काम करणं सोडू? लोकांमध्ये जाऊन जे लोकांचे मुद्दे आहेत ते उचलून त्याबाबत काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करणं हे काही चुकीचं काम आहे?
हे पद काही मंत्रिपद तर नाही ना.. हे काही दुसरं पद नाही की, त्यामुळे तुम्हाला फार काही अधिकार मिळतात. ही सगळी जबाबदारी ही पक्ष संघटनेची आहे. संघटनेत काम करणं हे अजिबात चुकीचं नाही. आज माझं वय वैगरे हे काढण्याची काय गरज आहे? माझ वय किती आहे आणि मी कोणत्या वयात थांबलं पाहिजे हे इतरांनी मला सांगावं? हा निर्णय माझा असू शकतो..
साहिल जोशी: आपल्याला अजूनही वाटतं की, विरोधकांची एकजूट होऊ शकते?
शरद पवार: आमचा हा प्रयत्न आहे की, एकत्र काम करून देशाला एक वेगळा पर्याय दिला पाहिजे. जी काही भाजपची हुकूमत आहे ती उखडून टाकण्याचा प्रयत्न आहे. राजकारणात सगळ्याच गोष्टी 100 टक्के यशस्वी ठरतात असं नाही. कोणी जिंकतं कोणी हरतं.. पण जो हरतं त्याची काही विचारधारा असेल, कार्यक्रम असेल.. तर ते सोडून न देता ते पुढे चालू ठेवलं पाहिजे. आम्ही मिळून काम करू.. आम्ही 17 किंवा 18 तारखेला बंगळुरूत भेटणार आहोत. तिथे आम्ही पुन्हा चर्चा करुन पुढची रणनिती ठरवू.
जेव्हा 15-20 पक्षांचे लोकं येऊन चर्चा करतात तेव्हा सर्वच लोकांची मतं एक नसतात. काही जणांची वेगळी मतं असतात. ही लोकशाही आहे.. लोकशाहीत वेगळी मतं मांडणं आणि त्यातून पुढे जाणं याची आवश्यकता असते.
आता पटेल साहेब म्हणाले की त्यांना हसू आलं.. त्यांना हसू येऊ शकतं कारण की, या सगळ्याचा मुद्द्यांचं गांभीर्य जेवढं आम्ही घेतो तेवढं बाकी लोकांनी घेतलं की नाही हे मला माहीत नाही. त्यामुळे त्यांना हसू येऊ शकतं.
हे ही वाचा >> Inside Story: शरद पवारांना दाखवला कात्रजचा घाट, अजितदादांनी 30 जूनलाच कसा साधला डाव?
साहिल जोशी: तीन पक्षाचं सरकार बनलं होतं तेव्हा हेच लोकं म्हणत होते की, तीन पक्षाचं सरकार चालू शकत नाही. आता ते स्वत: तीन पक्षाच्या सरकारमध्ये आहेत. आपल्याला वाटतं हे सरकार चालू शकेल?
शरद पवार: हे सरकार भाजप चालवेल.. दुसरं कोणी चालवू शकत नाही. अधिकार.. सर्वाधिक आमदार आणि दिल्लीचे गाइडलाइन हे तीनही भाजपसोबत आहे. बाकी लोकं सरकारमध्ये राहतील मंत्री बनून आनंदाने.. बाकी दुसरं काही नाही..
जिथवर महाराष्ट्राचा प्रश्न आहे.. तिथं कोणतंही सरकार असो.. महाराष्ट्रात मला स्थिरता हवी आहे. या तिघांचं सरकार बनलं.. तर स्थिर सरकार द्या.. महाराष्ट्राच्या विकासाबाबत विचार करा. बाकी दुसरा प्रश्न माझ्या मनात येतही नाही.
साहिल जोशी: आता आपण पक्ष कशा पद्धतीने बांधणार आहात? निवडणूक आयोगाकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत आणि आपण पुढे कसे जाणार आहात?
शरद पवार: निवडणूक आयोग वैगरे यांची कितवर मदत होईल हे मला माहीत नाही.. ठीक आहे की प्रयत्न करावे लागतात ते करू. पण नवी जी पिढी हजारोंच्या संख्येने तयार होतेय त्या लोकांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करणं हा माझा प्रयत्न आहे. मी तेच काम करेन बाकी दुसरं काही काम करणार नाही.
साहिल जोशी: आपल्यासाठी मोठा झटका आहे हा.. प्रफुल पटेल हे म्हणाले की, ते तुमच्यासोबत सावलीसारखे राहिले. अजित पवारांना तुम्ही बोटाला धरून राजकारणात आणलं. आपल्याला स्वत:ला मोठा धक्का होता हा?
शरद पवार: पर्सनल लेव्हल वैगरे काही नाही.. कारण की, अशी स्थिती मी एक, दोन तीनदा पाहिली आहे आणि सहनही केली आहे आणि त्यातून मार्गही काढला आहे. ही गोष्ट सत्य आहे की, ज्या लोकांच्या निवडणकुीसाठी आम्ही मेहनत केली महाराष्ट्राच्या जनतेने ताकद दिली त्या लोकांकडे दुर्लक्ष करुन चुकीच्या मार्गावर जाण्याचं काम त्यांनी केलं. याचं मला दु:ख आहे. बाकी मी अजिबात चिंतीत नाही.
यापुढे जाऊन पक्ष कसा उभा करायचा याचा संपूर्ण नकाशा माझ्या डोक्यात तयार आहे. मी काम करणं सुरू करेन, मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही. फक्त नवा वारसा कसा तयार होईल ते मी पाहील.
साहिल जोशी: आज या वयातही आपण ज्या पद्धतीने बाहेर पडून प्रचार करत आहात.. त्या सगळ्यासाठी आपल्याला शुभेच्छा
शरद पवार: आपण बोललात ती चांगली गोष्ट आहे. पण आपल्या एका वाक्याबाबत मी नाराज आहे.. आपण म्हणतात की, या वयात… या वयात म्हणजे काय? हे काय वय आहे.. मोररजी भाई देसाई कोणत्या वयात देशाचे पंतप्रधान झालेले? मला तर पंतप्रधान व्हायचं नाही.. मला कोणतं मंत्रिपद नकोय.. मला फक्त संघटनेत काम करायचं आहे. तेव्हा तिथे कुठे वय आड येतं. ना टायर्ड हूँ ना रिटायर्ड हूँ… मेहनत करेन.. नव्या लोकांना महाराष्ट्राच्या जनेतेची सेवा करण्यासाठी तयार करू.
ADVERTISEMENT