जयंत पाटलांचं कौतुक, ठाकरेंनी सगळा इतिहासच काढला! ‘सामना’तून पुन्हा ‘वार’
जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. केंद्रीय यंत्रणांच्या याच चौकशीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांवर बोट ठेवलं आहे.
ADVERTISEMENT
Political News of Maharashtra : ‘पाटला-पाटलांतला फरक’, या शीषर्काखाली लिहिलेल्या अग्रलेखातून सामनाचे संपादक असलेल्या उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपवर ‘वार’ केला आहे. जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. केंद्रीय यंत्रणांच्या याच चौकशीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांवर बोट ठेवलं आहे. सचिन वाझे, परमबीर सिंग, समीर वानखेडे या वादग्रस्त ठरलेल्या अधिकाऱ्यांबरोबरच किरीट सोमय्या, दादा भुसे, प्रविण दरेकर यांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखात भूमिका मांडताना म्हटलं आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांची मंगळवारी ईडीने तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. या काळात जयंतरावांनी एक पुस्तक वाचून संपवले. आयएएल अॅण्ड एफएस या कंपनीच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीचा तपास सुरू आहे. या कथित घोटाळय़ाप्रकरणी ईडीला अधिक माहिती हवी आहे व त्यासाठी जयंत पाटील यांना पाचारण केले. ही माहिती ते लेखी स्वरूपातही मागवू शकले असते, पण एकदा त्रास द्यायचा म्हटलं की, सभ्यता गुंडाळून ठेवली जाते. ज्या प्रकरणात जयंतरावांना बोलावले तो काय प्रकार आहे? पण ‘घोटाळा घोटाळा’ म्हणून भुई बडवली जात आहे. या कथित घोटाळ्याशी संबंधित राजकारणी भाजप परिवारातही असू शकतील, पण त्यांना चौकशीसाठी अशी बोलावणी केली जात नाहीत. तो मान फक्त भाजपपुढे न झुकणाऱ्या विरोधकांचा.”
भाजपमध्ये गेल्यावर सुखाने झोप
अग्रलेखात पुढे म्हटलं आहे की, “जयंत पाटील दुपारी बारा वाजता ईडी कार्यालयात गेले व रात्री साधारण दहा वाजता बाहेर पडले. ते हसतमुख होते व त्या रात्री त्यांना सुखाने झोप लागली असेल. निर्भय माणसेही शांत झोपतात. हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत व त्यांनी मध्यंतरी जाहीर केले होते की, ‘मला आता शांत सुखाने झोप लागते. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सवाल्यांची भीती आता अजिबात नाही. कारण मी दाराला भाजपचे कडीकोयंडे लावले आहेत!’ सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील यांनासुद्धा सुखाने झोप लागत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहेच. काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्याने त्यांच्यावरील ईडी वगैरेंचे बालंट टळले आहे. शिवसेनेचे 40 आमदार ईडी, सीबीआयच्या भयाने उंदरासारखे पळाले. त्यापैकी अनेकांवर चौकश्यांचे समन्स व अटकेचे वॉरंट होते. पक्षांतर करताच भाजपने त्यांना ईडीपासून अभय दिले, पण जे भाजपच्या कुटील कारस्थानाला बळी पडले नाहीत असे छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांसारखे नेते ईडी कारवाईचे बळी ठरले.”
हे वाचलं का?
हेही वाचा >> MVAचा जागा वाटपाचा तिढा सुटला? नाना पटोलेंनी ‘मुंबई Tak’वर सांगितला फॉर्म्युला
“जयंत पाटील यांनीही भाजपची गुलामी पत्करायचे नाकारले व लगेच त्यांना ईडीचे बोलावणे आले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ईडीने अनेकांच्या बाबतीत हे घडवले आहे. नवाब मलिक यांच्यावरचे गुन्हेदेखील खोटे ठरतील अशी आता स्थिती आहे”, असं भाष्य अग्रलेखातून करण्यात आलं आहे.
समीर वानखेडे प्रकरण, भाजप टोळ्यांची चौकशी करणार का? ठाकरे गटाचा सवाल
“मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचार, खंडणीखोरी, दहशत वगैरेंचे आरोप पुराव्यांसह केले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन यास ‘कॉर्डिलिया’ क्रूझ प्रकरणात ‘ड्रग्ज’ बाळगल्याच्या आरोपावरून अटक केली. सुशांतसिंह राजपूतप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला याच पद्धतीने अडकवले होते. अनेक निरपराध्यांचे बळी अशा प्रकारे घेतले. वानखेडेंचा दरबार व कारभार आता उघडा पडला आहे. अशा अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ भाजपचे मुंबईतील भातखळकरांसारखे अनेक उठवळ आमदार त्यावेळी रस्त्यावर उतरून नवाब मलिक यांच्याविरोधात बोंबा मारीत होते. वानखेडे प्रकरणात भाजपच्या अनेक नेत्यांचे हात बरबटले आहेत व त्यांचीदेखील चौकशी व्हायला हवी. खार येथील एका टिनपाट भाजप नेत्याच्या घरी वानखेडे व त्यांच्या टोळीच्या बैठका चालत व तेथे देण्याघेण्याचे व्यवहार होत. अनेकदा वरिष्ठ भाजप नेते त्या ठिकाणी चहापाण्यासाठी ये-जा करीत असे सांगितले जाते. वानखेडे प्रकरण सरळसाधे नाही. या प्रकरणात भाजप पूर्ण बुडाला आहे, पण जयंत पाटलांची चौकशी करणाऱ्या यंत्रणा या भाजप टोळ्यांची चौकशी करणार काय?”, असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Jayant Patil, IL&FS scam : नऊ तास चौकशी, पण ईडीने पाटलांना कोणते प्रश्न विचारले?
“अनिल देशमुखांना खोट्या प्रकरणात अडकविण्यासाठी परमबीर सिंग यांचा वापर केला. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्पह्टके ठेवणे, मनसुख हिरेनची हत्या करणे अशा कटांत ज्यांचा थेट सहभाग होता, त्या परमबीर यांना मिंधे-फडणवीस यांच्या सरकारने आता पुन्हा सेवेत घेतले. राज्याचे माजी गृहमंत्री देशमुख यांच्यावर आरोप करून तुरुंगात पाठवले याचे बक्षीसच परमबीर यांना सध्याच्या सरकारने दिले. उद्या हे सरकार व केंद्रीय यंत्रणा वाझे, प्रदीप शर्मा यांनाही ‘क्लीन चिट’ देतील. या सरकारचा काहीच भरवसा नाही. समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप खरे ठरले. मलिक यांनी इतरही काही स्पह्टक माहिती समोर आणली व त्यामुळेच त्यांच्याविरोधात कारस्थान रचून त्यांना आत टाकले गेले. विरोधकांवर दबाव आणण्यासाठी हे सर्व बिनबोभाट चालले आहे”, असा गंभीर आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
दादा भुसे, किरीट सोमय्या आणि प्रविण दरेकर; भ्रष्टाचाराचे आरोप
दादा भुसे यांच्यावर पुन्हा एकदा आरोप करण्यात आले आहेत. ठाकरे गटाने म्हटलं आहे की, “मिंधे सरकारमधील एक मंत्री दादा भुसे यांनी ‘गिरणा मोसम सहकारी कारखाना बचाव’च्या नावाखाली दीडशे कोटींच्या आसपास रक्कम शेतकऱयांकडून जमा केली. त्या पैशांचे पुढे काय झाले? मोठा घोटाळा त्यात आहे. तपास यंत्रणा त्यावर गप्प आहेत. भाजपचे आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी कारखान्याची लूटमार करून 500 कोटींचा अपहार केला. त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र फडणवीस व तपास यंत्रणा त्यासंदर्भात गप्प आहेत.”
Video >> क्लिनिक सांभाळत महाराष्ट्रातून पहिली आलेल्या कश्मिरानं यूपीएससी परीक्षा क्रॅक केली
“किरीट सोमय्यांचा आयएनएस विक्रांत घोटाळा, प्रवीण दरेकर यांचा मुंबई बँक कर्ज घोटाळा, भाजपच्या लाडांपासून पंबोजपर्यंत सगळ्या घोटाळेबाजांना 24 तासांत ‘क्लीन चिट’ देऊन विरोधकांना मात्र खोट्या प्रकरणात चौकश्यांच्या फेऱ्यांत अडकवले जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या घरगड्यासारख्या वागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांची साडेनऊ तास चौकशी होते, पण भाजपमधील भ्रष्टाचाऱ्यांना मोकळे रान मिळते. मात्र चौकश्यांचा कितीही फेरा मागे लावलात तरी स्वाभिमानींना शांत झोप लागते हे जयंत पाटील यांनी दाखवून दिले. पाटला-पाटलांत फरक असतो! काही पाटलांचे पाणीच वेगळे असते. जयंतराव त्यापैकीच आहेत,” अशा शब्दात जयंत पाटील यांच्या भूमिकेचं कौतुक करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT