
"छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्य रक्षक म्हणतो. ते धर्मवीर नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचा कुठे पुरस्कार केला नाही." अजित पवारांनी केलेल्या याच विधानावरून राज्यातलं राजकारण तापलंय. अजित पवारांविरोधात भाजप रस्त्यावर उतरल्यानंतर ठाकरेंनी मैदानात उडी घेत भाजपवर हल्ला चढवला.
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असं अजित पवारांनी म्हटल्यानं भाजपने त्यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू केलंय. भाजपनं सोमवारी (1 डिसेंबर) राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली. भाजप आक्रमक झाल्यानंतर ठाकरेंनी सामना अग्रलेखातून भाजपवर पलटवार केला आहे.
अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेशी सहमत नसल्याचं ठाकरेंनी सुरूवातीलाच सामना अग्रलेखातून स्पष्ट केलंय. अग्रलेखात म्हटलंय की, "अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासंदर्भात केलेल्या विधानावरून भाजपने धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. संभाजीराजांचे बलिदान हे धर्मासाठीच होते याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही, पण छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्य रक्षणासाठीही छत्रपती संभाजीराजेंनी त्याग आणि बलिदान केले. अजित पवार म्हणतात, 'छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक होते. धर्मवीर नव्हते.' आम्ही म्हणतो, खरा धर्मवीरच स्वराज्याचा रक्षक असतो. तेव्हा त्यात उगाच श्लेष काढून कोणाला छाती पिटण्याची गरज नाही", असं म्हणत अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलंय.
या विधानावरून एकनाथ शिंदेंनी अजित पवारांवर टीका केली. त्यावर सामना अग्रलेखात म्हटलंय की, "अजित पवारांनी तारतम्य बाळगावे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तारतम्याची भाषा मुख्यमंत्री शिंदे यांनी करावी हे आश्चर्यच आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा अपमान राज्यपाल कोश्यारी व भाजपच्या अनेक पुढाऱ्यांनी केला तेव्हा 'राज्यपाल, तारतम्य बाळगा!' असे सांगण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांना झाली नाही. कुणी शिवरायांना 'माफीवीर' म्हणाले, तर कुणी 'इतिहासातील जुने नेते' म्हणून शिवरायांची चेष्टा केली. हे काय तारतम्यास धरून होते?", असा सवाल शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्यमंत्री शिंदेंना केलाय.
शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अग्रलेखात पुढे म्हटलंय की, "स्वराज्य रक्षणासाठी संभाजीराजांनी इतिहासातील सगळ्यात मोठा त्याग व बलिदान केलं. एखादा तपस्वी व धर्मवीरच असं बलिदान करू शकतो."
"त्या धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे 'अण्णाजी पंत' आज सत्तेवर आहेत, राजभवनात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना पाठीशी घालणारे अण्णाजी पंतांचे समर्थक अजित पवारांना तारतम्य बाळगण्याचा सल्ला देतात हीच खरी गंमत आहे. आधी शिवराय अपमानप्रकरणी राज्यपालांना हटवण्याची मागणी करा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे तारतम्य बाळगणार आहेत काय?", असं म्हणत शिवसेनेनं राज्यपालांनी केलेल्या विधानावरून शिंदे-फडणवीसांना डिवचलं आहे.