Uddhav Thackeray : “…मग आम्हाला अपात्र का केलं नाही?”, ठाकरेंचा नार्वेकरांना संतप्त सवाल
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला. सभापतींच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray Mla Disqualification case Verdict : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला. नार्वेकरांनी ठाकरेंना शिंदेंना हटवण्याचे अधिकारच नाही, असे स्पष्ट करताना १६ आमदारांविरोधातील याचिका फेटाळली. त्याचबरोबर सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नियुक्तीही बेकायदेशीर ठरवली. नार्वेकरांनी दिलेल्या या निकालानंतर उद्धव ठाकरेंना संताप अनावर झाला. (Uddhav Thackeray claims that rahul narvekar not followed direction of supreme court)
निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरेंनी निकालावर भाष्य केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्या पद्धतीने लवाद म्हणून नार्वकरांना बसवले, त्यांची वागणूक ही स्पष्टपणे हे दर्शवणारी होती की याची मिलीभगत झालेलं आहे. लोकशाहीचा खून करण्यासाठी याचं काही कटकारस्थान चालेलं आहे का? असे मी म्हणालो होतो. आजच्या निकालामुळे एक गोष्ट प्रश्नांकित झाली आहे, ती म्हणजे पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी पक्षांतर कसं करावं, पक्षांतराचा राजमार्ग कसा असला पाहिजे, हे त्यांनी दाखवून दिले.”
“सर्वोच्च न्यायालयाला जुमानत नाही, हेच दिसून आलं”
“त्यांनी स्वतः दोन-तीन पक्ष बदलले आहेत. त्याच्यामुळे भावी वाटचालीतील अडथळा दूर करून घेतला असेल, मात्र आजपर्यंत आपण असं मानत आलो आहोत की, सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च असतात, ते परिमाण ठरलेलं असतं. अनिल परब यांनी न्यायालयाने काय निर्देश दिले हे सांगितलं होतं. ते संपूर्णपणे पायदळी तुडवले. आमच्या मागे महाशक्ती आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाही जुमानत नाही, हे त्यांच्या आजच्या निकालातून दिसून आलं आहे”, असे ठाकरे म्हणाले.