
Vanchit Bahujan Aaghadi chief prakash Ambedkar mp on rajyasabha in 1990
शिवसेना (UBT) आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून या आघाडीची घोषणा झाली. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी याची घोषणा केली. (Vanchit Bahujan Aaghadi chief prakash Ambedkar mp on rajyasabha in 1990)
या आघाडीची घोषणा झाल्यापासून प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. मागील तीन दशकांपासून आंबेडकर यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर प्रामुख्याने घेतलं जातं. कधी काँग्रेससोबत तर कधी काँग्रेसच्या विरोधात जाऊन त्यांनी राजकारण केलं आहे. आता पहिल्यांदाच ते हिंदुत्ववादी शिवसेना (UBT) पक्षाशी जोडले गेले आहेत. मात्र या सगळ्या दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणाची सुरुवात नेमकी कधी झाली अन् ते पहिल्यांदा खासदार कसे झाले हे बघणं महत्वाच ठरतं.
साधारण १९८२-१९८३ च्या दरम्यान, सामाजिक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन प्रकाश आंबेडकर राजकारणात आले. त्यानंतर पुढच्या राजकीय वाटचालीसाठी आंबेडकरांनी अकोला जिल्ह्याची निवड केली. ते १९८४ साली अकोल्यातून लोकसभेच्या मैदानात उतरले. मात्र काँग्रेसच्या मधूसुदन आत्माराम वैराळे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
त्यानंतर १९८९ च्या निवडणुकीत भाजपच्या पांडूरंग फुंडकरांकडून आंबेडकरांचा पराभव झाला. १९८४ ते १९८९ च्या दरम्यान, देशाच्या राजकारण अनेक घडामोडी घडल्या होत्या. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राजीव गांधी यांच्यासह स्वपक्षीयांवरच आरोप करत व्ही. पी. सिंग काँग्रेसमधून बाहेर पडले. जनता दलाची स्थापना झाली. राजीव गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचा पराभव करुन भाजपच्या मदतीने व्ही. पी. सिंग सत्तेत आले.
ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे म्हणाले, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळातून बाहेर पडलेल्या व्ही. पी. सिंग यांचा राजकारणाचा गाभा नंतर 'सामाजिक न्याय' झाला. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची घोषणा करुन त्यांनी बिगर कॉंग्रेस राजकारणाला 'मागासवर्गीय- अल्पसंख्याक पाया' देण्याचा प्रयत्न केला. देशात तेव्हा 'मंडल विरुद्ध कमंडल' असं वातावरण तापलं.
सिंग यांनी कॉंग्रेस - भाजप वगळून आपल्या राजकारणाचा पाया व्यापक करण्याचा प्रयत्न वेगाने सुरु केला. त्यासाठी त्यांनी 'सामाजिक न्याया' ची भूमिका असणाऱ्यांना जवळ करायला सुरुवात केली. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तर 'आंबेडकर' आडनांव होतं. त्यामुळे, आंबेडकर यांचे वारस म्हणून, मागासवर्गीयांचे उद्या देशपातळीवर नेते होतील या अपेक्षेने १९९० मध्ये राष्ट्रपती कोट्यातून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेवर संधी दिली गेली अन् ते पहिल्यांदा खासदार झाले.
या दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी १९९१ आणि १९९६ यावर्षांत अकोल्यामधून लोकसभेची निवडणूक लढविली. मात्र त्यांना यश येऊ शकलं नाही. १९९१ साली प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानावर राहिले. तर १९९६ साली भाजपच्या फुंडकर यांच्याविरुद्ध ९ हजार मतांनी आंबेडकर यांना पराभव स्वीकारावा लागला. या दरम्यान, आंबेडकरांनी भारीप बहुजन महासंघाची स्थापना त्यांनी केली.
१९९८ च्या निवडणुकीत शरद पवार यांनी दलित नेत्यांना सोबत घेऊन एक राजकीय समीकरण जुळवलं. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, रा. सू. गवई, जोगेंद्र कवाडे या नेत्यांनी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला आणि यातून हे सर्व जण लोकसभेवर निवडून गेले. पुढे १९९९ मध्ये पुन्हा एकदा भारीप बहुजन महासंघाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर ८ हजार मतांनी विजयी झाले. मात्र त्यानंतरच्या २००४, २००९, २०१४ आणि २०१९ या चार लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आंबेडकर विजयी होऊ शकले नाहीत.