
भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यातील नेतृत्वाकडून डावललं जात असल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना असतानाच भाजपकडून पुन्हा एकदा डच्चू देण्यात आला आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने यादी जाहीर केली असून, भाजपने पाच जणांना उमेदवारी दिलीये. यात पंकजा मुंडेंना स्थान देण्यात आलेलं नाही.
राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. उद्या म्हणजेच ९ जून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून, भाजपने आज पाच उमेदवारांची यादी जाहीर केलीये. यात पंकजा मुंडे यांच्याबरोबरच चित्रा वाघ यांना वगळण्यात आलं आहे.
भाजपकडून सध्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सध्या भाजपकडे चार सहज निवडून येतील इतकं संख्याबळ आहे. मात्र, भाजपने पाचवा उमेदवार उतरवल्याने राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणूकही चुरशीची होणार हे स्पष्ट झालं आहे.
2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून पंकजा मुंडे या राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असल्याचं दिसतंय. त्यांनी वेळोवेळी याबद्दल अप्रत्यक्षपणे बोलूनही दाखवलं आहे. भाजपकडून विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी जाहीर होण्याच्या काही दिवस आधी पंकजांनी सूचक विधान केलं होतं.
विधान परिषदेला उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. विधान परिषदेला संधी मिळाली, तर संधीचं सोनं करेन असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या नावाची भाजपमध्येच चर्चाही सुरू होती. मात्र, आज जाहीर करण्यात आलेल्या यादीतून पंकजांना पुन्हा डावलण्यात आलं आहे.
चित्रा वाघ यांचीही निराशा
भाजप महिला आघाडीचा आक्रमक चेहरा बनलेल्या चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मागच्या विधान परिषद निवडणुकीवेळीही चित्रा वाघ या इच्छुक होत्या, मात्र त्यावेळी त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. यावेळीही त्यांची वर्णी लागलेली नाही. त्यांच्याऐवजी भाजपने भाजप महिला मोर्च्याच्या अध्यक्षा उमा खापरे यांना उमेदवारी दिलीये.
त्यांच्याबरोबर भाजपचे सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनाही संधी देण्यात आलीये. प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि राम शिंदे यांची नावं आधापासूनच निश्चित मानले जात होते. कारण हे तिन्ही नेते देवेंद्र फडणवीय यांचे निकटवर्तीय असल्याचं मानलं जातं.