पुतिन यांच्याविरोधात बंड, मोदींना इशारा; शिवसेनेने (UBT) सांगितला भारतातील वॅग्नर ग्रुप
भारतीय जनता पक्षाविरुद्ध एकास एक लढत देऊन 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या भाजपचा पराभव करण्याचे या बैठकीत ठरले, असे शिवसेनेने म्हटले आहे.
ADVERTISEMENT

Narendra Modi Vs Uddhav Thackeray : बंडाचं निशाण फडकावलेल्या वॅग्नर ग्रुपसोबत तह करण्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना यश आलं. पण, या बंडाने पुतिन हादरल्याची चर्चा जोरात सुरू आहे. रशियातील वॅग्नर ग्रुपच्या बंडाकडे लक्ष वेधत शिवसेनेने (UBT) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला इशारा दिला आहे. विरोधी पक्षाची एकी भाजपसमोर मोठं आव्हान असल्याचा दावाही ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
सामना अग्रलेखात शिवसेनेने (UBT) म्हटलं आहे की, “पाटण्यात शुक्रवारी 17 प्रमुख राजकीय पक्षांची प्रदीर्घ बैठक झाली. भारतीय जनता पक्षाविरुद्ध एकास एक लढत देऊन 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या भाजपचा पराभव करण्याचे या बैठकीत ठरले. लोकशाहीच्या दृष्टीने ही आनंदवार्ता आहे. या बैठकीवर गृहमंत्री अमित शाह यांनी अपेक्षित प्रतिक्रिया दिलीच आहे. अमित शाह म्हणाले, ‘विरोधक फोटोसाठी एकत्र जमले व कितीही विरोधक एकत्र आले तरी भाजप 300च्या वर जागा जिंकेल हे नक्की.’ शाह यांचे हे वरवरचे अवसान आहे.”
फोटोसाठी मोदींनी मंत्र्यांना ढकलून दिले -ठाकरे
“देशात ‘फोटोप्रेमी’ कोण? हे 140 कोटी जनता रोज पाहत आहे. फोटो किंवा प्रसिद्धीच्या आड येणाऱ्या आपल्याच नेत्यांना, मंत्र्यांना कसे ढकलून दूर केले जाते हे मोदी यांनी अनेकदा दाखवून दिले. भाजपचे सर्व कार्यक्रम जनता किंवा देशासाठी नसून फोटोसाठीच असतात यात नव्याने सांगावे असे काय आहे? राहता राहिला प्रश्न 2024 ला काय निकाल लागेल याचा. या वेळचा निकाल ‘ईव्हीएम’ लावणार नाही, जनताच लावेल. ‘ईव्हीएम’चा घोटाळा झाल्याचा संशय आला तर मणिपूरसारखी परिस्थिती त्या वेळी देशात निर्माण होईल. इतका उद्रेक जनतेच्या मनात साचला आहे.”
सामना अग्रलेखात काय म्हटलंय?
“विरोधक पाटण्यात फोटो काढण्यासाठी जमले हे मान्य केले तरी त्यांचा इतका धसका का घ्यावा? कालपर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘नड्डा’ वगैरे लोक ‘अब की बार भाजप 400 पार’ अशा गर्जना करीत होते. पाटण्याच्या फोटोसेशननंतर स्वतः अमित शाह म्हणतात, ‘आम्ही 300 जागा जिंकू.’ म्हणजे विरोधकांच्या एका फोटो सेशननेच भाजपच्या 100 जागा कमी केल्या व हीच विरोधकांच्या एकीच्या वज्रमुठीची ताकद आहे. भारतीय जनता पक्ष हा हवेने भरलेला फुगा आहे. तो जरा जास्तच फुगवला आहे. सत्ता, मत्ता आणि प्रसिद्धी यामुळे लोकांत भ्रम निर्माण करता येतो, पण लोकांच्या मनावर प्रदीर्घ काळ सत्ता गाजवता येत नाही.”










