जिथे-जिथे निवडणूक, तिथे-तिथे जातीय तणाव… निव्वळ योगायोग की राजकीय डाव?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘इस बार दंगा बहुत बड़ा था, खूब हुई थी ख़ून की बारिश, अगले साल अच्छी होगी फसल मतदान की’ भारतातील राजकीय व्यवस्थेचा वेध घेत या ओळी अनेक दशकांपूर्वी लिहिल्या गेल्या होत्या, पण आजही देशात घडत असलेल्या जातीयवादी घटनांवर ही टिप्पणी अचूक लागू होत असल्याचं दिसतं आहे.

2022 वर्ष सुरू झाले तेव्हा देश कोव्हिडची दुसरी लाट मागे टाकून यूपीसह पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त झाला होता. निवडणुका झाल्या, निकाल आले आणि वेगवेगळ्या राज्यांत सरकारं आली. दरम्यान, भारतातील राजकीय पक्ष हे नेहमीच निवडणूक मोडमध्ये असतात असे म्हटले जाते. कारण एका ठिकाणी निवडणुका संपल्या की इतर ठिकाणच्या निवडणुकांची तयारी सुरू झालेली असते.

आता याला योगायोग म्हणा किंवा राजकीय षडयंत्र पण ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत तिथे जातीयवादाची विषारी हवा पसरवली जात असल्याचं उघड्या डोळ्यांनी आपल्याला पाहायला मिळत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

छोट्या-छोट्या घटना या मोठ्या जातीय तणावाचे कारण बनत आहेत. किरकोळ घटनांवरुन देखील जमाव रस्त्यावर येतो आणि कायदा व सुव्यवस्था अक्षरशः मोडीत निघते. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर अशा घटनांचा बराच गाजावाजा होतो आणि रोज कुठल्या ना कुठल्या भागातून अशा बातम्या आता समोर येऊ लागल्या आहेत. मग ते राजस्थान असो, कर्नाटक असो, गुजरात असो की दिल्ली नाहीतर महाराष्ट्र. जिथे विधानसभा, महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत तिथे अशा घटना अधिक तीव्रतेने घडत असल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात जातीय तणाव का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील काही जिल्हांमध्ये अगदी किरकोळ कारणावरुन जातीय हिंसा भडकल्याचं दिसून आलं आहे. अगदी कालच जालनातील एका गावात कमानीला नाव देण्यावरुन हिंसा उसळली होती.

ADVERTISEMENT

दुसरीकडे मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरवरील अजान आणि हनुमान चालीसा या सगळ्या वादातून राजकारण तापवलं आहे. राज ठाकरे उघडपणे हिंदुत्वाचे कार्ड खेळत असून, त्यात भाजपचा त्यांना पाठिंबा मिळत असल्याचंही पाहायला मिळत आहे.

याशिवाय अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. अशा स्थितीत राजकीय तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.

अशी परिस्थिती असतानाच आता लवकरच मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. पण राज ठाकरे हे आता भाजपसोबत महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.

राजस्थानमधील अनेक शहरात तणावाचं वातावरण

राजस्थानबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या महिनाभरात पाच जिल्ह्यांमध्ये जातीय तणावाच्या अशा घटना घडल्या आहेत. 2 एप्रिल रोजी, करौली येथे हिंदू नववर्षानिमित्त बाईक रॅलीत कथित दगडफेकीनंतर जातीय हिंसाचार उसळला होता. भीषण जाळपोळ आणि दगडफेकीनंतर संपूर्ण परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.

यानंतर, 18 एप्रिल रोजी अलवर जिल्ह्यात बुलडोझरने मंदिर पाडण्याची घटना घडली आणि 22 एप्रिल रोजी त्याचा व्हिडिओ समोर आल्यावर एकच गदारोळ उडाला होता.

2 मे रोजी जोधपूरमध्ये ईद आणि परशुराम जयंतीनिमित्त गदारोळ झाला होता, तर 10 मे रोजी भीलवाडा येथे 20 वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर जातीय तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 11 मे रोजी हनुमानगडमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) स्थानिक नेत्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर तेथील वातावरणही तापले होते.

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असून येथे पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राजस्थानचा राजकीय मूड असा आहे की, दर पाच वर्षांनी येथे सरकार बदलते. त्यामुळेच आता भाजपने पुन्हा सत्ता मिळविण्याची तयारी सुरू केली आहे.

गेहलोत यांच्या राजवटीत हिंदूंवर अत्याचाराचा होत असल्याचा भाजप सातत्याने आरोप करत आहे. या घटनांबाबत पक्षातील सर्वच बडे नेते रस्त्यापासून ते सोशल मीडियापर्यंत काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत या घटनांना भाजपचा राजकीय डाव असल्याचं म्हणत आहेत.

मध्य प्रदेशात अचानक वाढला जातीय हिंसाचार

मध्य प्रदेशातील अत्यंत शांत समजल्या जाणाऱ्या माळवा-निमार परिसरात गेल्या वर्षभरापासून जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मध्यप्रदेशातील माळवा विभागातील उज्जैन, इंदूर आणि मंदसौर या तीन जिल्ह्यांमध्ये गेल्या दीड वर्षांत जातीय हिंसाचाराच्या 12 हून अधिक घटना घडल्या आहेत.

खरगोनमध्ये 10 मे रोजी रामनवमीच्या मिरवणुकीत डीजे वाजवण्यावरून झालेल्या वादानंतर जातीय हिंसाचार उसळला होता. प्रकरण इतके वाढले की, राज्य सरकारच्या आदेशावरून संशयितांची घरे बुलडोझरने पाडण्यात आली.

इंदूरमध्येच मुस्लिमबहुल बॉम्बे मार्केटमध्ये मुस्लिम वेषात दोन मुली एका पुरुषासोबत होत्या. या सर्वांची जेव्हा ओळखपत्रं तपासली गेली तेव्हा ते तिघेही हिंदू असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दुसरीकडे हरदोई येथील एका मुस्लिम तरुणाला हिंदू वस्तीत बांगड्या विकत असल्याने मारहाण करण्यात आली होती.

25 डिसेंबर 2020 रोजी उज्जैनच्या बेगम बाग भागात भाजप युवा मोर्चाच्या रॅलीवर झालेल्या दगडफेकीमुळे हिंसाचार उसळला होता. 29 डिसेंबर 2020 रोजी मंदसौरच्या चंदनखेडी, इंदूर आणि दोराना गावात VHP नेत्यांनी रॅली काढल्यानंतर हिंसाचार झाला होता.

मध्यप्रदेशात 2023 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

राजस्थानप्रमाणेच मध्य प्रदेशात देखील 2023 च्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. जिथे भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत असणार आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सलग 15 वर्षे भाजप सत्तेत होती. पण या निवडणुकीत त्यांना आपलं सरकार गमवावं लागलं होतं.

कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विजयी होऊन सरकार स्थापन करण्यात यशस्वी ठरली होती. परंतु 2020 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसचं सरकार पडलं आणि भाजपने पुन्हा एकदा मध्य प्रदेशची सत्ता काबीज केली.

सिंधियांसोबत बंड करणारे काँग्रेसचे बहुतांश आमदार हे माळवा-निमारमधील होते. येथे झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर भाजपच्या तिकिटावर पुन्हा आमदार झाले. त्यापैकी अनेकांना शिवराज सरकारने मंत्रीपदेही बहाल केली आहेत.

खरगोनमधील हिंसाचारावर काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी आरोप केला होता की, देशातील विविध राज्यांमध्ये रामनवमीच्या सणावर उसळलेल्या जातीय दंगली पूर्णपणे प्रायोजित आहेत आणि त्यामागे एक पॅटर्न कार्यरत आहे.

धार्मिक उन्माद हे सत्ताधारी भाजपचे सर्वात मोठे हत्यार असल्याचे सांगून काही मुस्लिम संघटना भाजपसोबत राजकीय खेळ खेळत असल्याचा दावाही सिंह यांनी केला आहे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी राजकीय दुरुपयोग करणाऱ्या भाजपसाठी धार्मिक कट्टरता हे सर्वात मोठे हत्यार असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

पुढील वर्षी मध्यप्रदेशात होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा एकदा कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे, तेव्हा शिवराज सरकारचा दृष्टीकोन यावेळी बदलला आहे आणि यूपीच्या योगी सरकारच्या धर्तीवर ते आपली रणनिती आखत आहेत.

कर्नाटकात हिजाबपासून हलालपर्यंत पोहोचलं प्रकरण

कर्नाटकात पुढील वर्षी मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. येथे सध्या भाजपची सत्ता आहे. राज्यात त्यांची स्पर्धा काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरशी आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ध्रुवीकरणाचे राजकारण जोर धरत आहे.

मुस्लिम मुलींच्या हिजाबला विरोध करण्याच्या मुद्द्यावरुन कर्नाटकात जातीय हिंसाचार सुरू झाला आणि नंतर हलाल, अजान आणि मुस्लिमांच्या आर्थिक बहिष्कारापर्यंत हे संपूर्ण प्रकरण पोहोचलं आहे.

एवढेच नाही तर हुबळीमध्ये एका सोशल मीडिया पोस्टनंतर हिंसाचार देखील उसळला होता. हल्लेखोरांनी पोलिसांची वाहने, जवळचे रुग्णालय आणि धार्मिक स्थळाचे प्रचंड नुकसान केले होते. यामध्ये काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते. त्यामुळे हुबळी शहरात कलम 144 लागू करावे लागले आणि सुमारे 40 लोकांना अटक करण्यात आली होती.

गुजरातमध्ये किरकोळ घटनांचे हिंसाचारात रूपांतर

गुजरातबद्दल बोलायचे झाले तर, या वर्षाच्या अखेरीस इथे देखील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आपण कल्पना तरी करू शकता का? एक रस्त्यावरी छोटासा अपघात देखील जातीय दंगलीत बदलू शकतो. नाही ना.. पण असं गुजरातमध्ये झालं आहे.

18 एप्रिल रोजी गुजरातच्या वडोदरा शहरात असंच काहीसं घडलं आहे. येथे एवढा जातीय तणाव पसरला की दोन्ही समुदायातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली आणि धार्मिक स्थळ आणि वाहनांचे नुकसान केले. या हिंसाचारात 8-10 जण जखमी झाले आहेत.

गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपची सत्ता असून, सहाव्यांदा सत्ता मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीत गुजरातमध्ये अचानक झालेले जातीय हिंसाचार यामुळे अनेक राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत.

दिल्लीतील जातीय तणाव ठरतायेत डोकेदुखी

दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंती मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीमुळे जातीय तणाव निर्माण झाला आणि दोन्ही समुदाय आमनेसामने आले. जहांगीरपुरी परिसरात वातावरण बिघडवल्याप्रकरणी दोन्ही समुदायाच्या लोकांना अटकही करण्यात आली होती. 2020 साली दिल्लीत भयंकर हिंसाचार उसळला होता.

दरम्यान, दिल्लीत देखील आता लवकरच महापालिका निवडणुका होणार आहेत. गेल्या 15 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या दिल्लीत महापालिका ताब्यात ठेवण्याटचं मोठं आव्हान भाजपसमोर आहे.

सध्या दिल्लीतील जहांगीरपुरी भागापासून सुरू झालेली ही बुलडोझर कारवाई ही मुस्लिमबहुल समजल्या जाणाऱ्या शाहीन बागपर्यंत पोहोचली आहे. अतिक्रमण हटवण्यावरून दिल्लीतील मुस्लिम भागात तणावाचे वातावरण आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी एमसीडीला पत्र लिहून शाहीनबाग, ओखला या मुस्लिमबहुल भागांसह सर्व ठिकाणचे अतिक्रमण हटवण्याचे आवाहन केले होते, ज्यानंतर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दिल्लीतील मुघल आणि मुस्लिमांच्या नावावर असलेल्या वसाहतींची नावे बदलण्याची मोहीम भाजप चालवत आहे. त्यामुळे दिल्लीत सातत्याने तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

हिमाचलमध्ये खलिस्तानी समर्थक अचानक सक्रिय

हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीपूर्वी अचानक खलिस्तानचा मुद्दा तापला आहे. हिमाचल प्रदेश सरकारने या वर्षी मार्चमध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टार दरम्यान मारला गेलेला खलिस्तानी दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा झेंडा असलेल्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातली होती. अशा परिस्थितीत शीख फॉर जस्टिस ही दहशतवादी संघटना संतापली आहे.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विधानसभेबाहेर खलिस्तानच्या समर्थनार्थ झेंडे फडकवले जात असताना गुरपतवंत सिंग पन्नू यांनी हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना धमकी दिली आहे. तथापि, यापूर्वी जून 2021 मध्ये, प्रसिद्ध नैना देवी मंदिराजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मैलाच्या दगडावर लिहिले होते की, ‘खलिस्तानची सीमा येथून सुरू होते’. त्यामुळे हिमाचलमध्ये निवडणुकीपूर्वी तणाव निर्माण झाला आहे.

Jalna Violence: गावातील कमानीला नाव देण्याच्या वादातून तुफान राडा, पोलिसांचा हवेत गोळीबार

आता या सगळ्या घटना लक्षात घेता अनेक राजकीय जाणकारांचं असं म्हणणं आहे की, भारतात जिथे-जिथे निवडणुका आहेत तिथे-तिथे जातीय तणाव पाहायला मिळतोय. त्यामुळे हा काही निव्वळ योगायोग असू शकत नाही. तर यामागे एखाद्या मोठा राजकीय डाव असू शकतो.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT