Navneet Rana यांच्यावर कारवाई का नाही? बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात कोर्टाचा पोलिसांना सवाल

वाचा सविस्तर बातमी काय म्हटलं आहे कोर्टाने?
Why no action against MP Navneet Rana? Court questions police in fake caste certificate case
Why no action against MP Navneet Rana? Court questions police in fake caste certificate case

बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणांवर कारवाई होत नसल्याने शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. खासदार नवनीत राणांवर कारवाई का होत नाही? आरोपी महाराष्ट्रातच आहे ना? असा सवाल कोर्टाने विचारला आहे. नवनीत राणा यांच्या बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात कारवाई करण्यासाठी मुलुंड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी वेळ मागितला आहे त्यावर न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केला आहे.

काय प्रश्न उपस्थित केले आहेत शिवडी न्यायलायने?

पोलीस मॅनेज झाले आहेत का?

खासदार नवनीत राणांवर अद्याप कारवाई का नाही?

आरोपी महाराष्ट्रातच आहे ना?

न्यायालयाच्या आदेशाचं पालन का होत नाही?

काय निर्देश दिले आहेत न्यायलायने?

न्यायालयाने पोलीस सहाय्यक निरीक्षकांनी मागितलेली कारवाईसाठीच्या अधिकच्या वेळाची संमती नाकारली आहे. तसंच लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात आता पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला होणार आहे. तक्रारदार जयंत वंजारी यांनी कोर्टाने नवनीत राणांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी केला असूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनास आणला त्यानंतर कोर्टाने हे प्रश्न विचारले आहेत.

नवनीत राणा यांच्यावर आरोप काय?

जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान बोगस जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने या वॉरंटवर मुलुंड पोलिसांना कारवाईचे आदेश जारी केले आहेत. नवनीत राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात या वॉरंट विरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका अद्याप प्रलंबित आहे. मुंबई सत्र न्यायालयानं अद्याप कारवाईला स्थगिती न दिल्यानं शिवडी कोर्टाने पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. परंतु अद्यापही पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता आणखी वेळ मागितल्याने शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसंच या प्रकरणात पोलीस मॅनेज झालेत का? असाही प्रश्न विचारला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in