IPL 2025: 35 चेंडूत 100 धावा करणारा 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मराठी आहे?
आयपीएल 2025 मध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने 35 चेंडूत शतक झळकावून एक नवा इतिहास रचला आहे. पण वैभव हा मराठी आहे का? अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT

जयपूर: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने क्रिकेट विश्वात इतिहास रचला. गुजरात टायटन्सविरुद्ध जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या सामन्यात वैभवने अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावत आयपीएलमधील सर्वात तरुण शतकवीराचा मान मिळवला. त्याच्या या खेळीने राजस्थानने 210 धावांचे आव्हान 16 षटकांतच पार केले. दरम्यान, आता वैभव सूर्यवंशीच्या शतकासोबतच तो मराठी आहे का? याविषयी देखील सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. चला, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
कोण आहे वैभव सूर्यवंशी?
वैभव सूर्यवंशी हा बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर गावातील रहिवासी आहे. त्याचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच त्याने क्रिकेटची बॅट हाती घेतली होती. त्याचे वडील संजीव सूर्यवंशी, जे शेतकरी आहेत, यांनी वैभवच्या क्रिकेटप्रती असलेल्या उत्साहाला ओळखून त्याच्यासाठी घराच्या मागील बाजूस छोटे मैदान तयार केले. वयाच्या नवव्या वर्षी वैभव समस्तीपुरच्या क्रिकेट अकादमीत दाखल झाला आणि त्याची प्रतिभा लवकरच सर्वांसमोर आली.
हे ही वाचा>> वडिलांनी विकलेल्या जमिनीचं पोरानं आज सोनं केलं, 35 चेंडूत शतक ठोकणारा 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
वैभवने वयाच्या 12व्या वर्षी बिहारसाठी विनू मांकड ट्रॉफीमध्ये सुमारे 400 धावा केल्या. यंदा त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंडर-19 कसोटी सामन्यात 58 चेंडूत शतक ठोकले होते. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला 1.10 कोटींना खरेदी केले, ज्यामुळे तो आयपीएल इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला.
वैभव सूर्यवंशी मराठी आहे का?
वैभव सूर्यवंशी हा मराठी नसून तो बिहारचा आहे. त्याचे मूळ गाव आणि कुटुंब बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात आहे, आणि तो बिहारच्या स्थानिक क्रिकेट संघाकडून खेळतो. त्याच्या नावातील "सूर्यवंशी" हे आडनाव राजपूत समाजाशी संबंधित आहे. जे बिहार आणि उत्तर भारतात सामान्य आहे. मराठी किंवा महाराष्ट्राशी त्याचा थेट संबंध नाही.