
विराट कोहलीचा ढासळलेला फॉर्म हा भारतीय संघासोबतच IPL मध्ये RCB साठी चिंतेचा विषय बनला आहे. सनराईजर्स हैदराबाद संघाविरुद्ध सामन्यात विराट शून्यावर माघारी परतला. यंदाच्या हंगामातलं विराटचं हे तिसरं गोल्डन डक ठरलं. या परिस्थितीत अनेक जणं विराटला विश्रांती घेण्याचा सल्ला देत असले तरीही माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी विराटला वेगळा सल्ला देत, भारतीय संघाकडून खेळताना विराटने विश्रांती घेऊ नये असं म्हटलं आहे.
"विश्रांती घेण्याचा मुद्दा असेल तर विराटने भारतीय संघाचे सामने चुकवायला नकोत. भारतीय संघाकडून खेळणाऱ्या सामन्यांना कधीही पहिलं प्राधान्य देण्यात यायला हवं. हे इतकं सोपं आहे", गावसकर Star Sports वाहिनीवर बोलत बोते. जर तुम्ही खेळणंच थांबवाल तर तुम्ही फॉर्मात कसे परताल, असाही सवाल गावसकर यांनी विचारला आहे.
काही दिवसांपूर्वीच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहली हा मानसिकदृष्ट्या थकलेला असून त्याने आता विश्रांती घेण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं होतं. परंतू गावसकरांनी या बाबतीत वेगळं मत व्यक्त केलं आहे.
"तुम्ही भारतात कोणालाही जाऊन विचारा, जी लोकं क्रिकेटचे सामने फॉलो करतायत ते हेच सांगतील की विराटने भारताकडून खेळताना फॉर्मात परतावं हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे भारताकडून खेळताना तुम्ही विश्रांती घ्यायला नको. प्रत्येकाची हीच इच्छा आहे की विराटने भारताकडून खेळताना फॉर्मात परतावं", गावसकर बोलत होते.