girgaon white strip : गिरगावातील ठाकूरद्वार परिसरातील मंगलवाडी येथे रंगवण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. यापूर्वी घाटकोपरमध्ये जैन मुनींना चालण्यासाठी रस्त्यावर पांढरे पट्टे काढल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर गिरगावातही अशाच प्रकारची तक्रार समोर आली. स्थानिक नागरिक आणि ‘आम्ही गिरगावकर’ या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकारावर आक्षेप घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण गल्लीमध्ये कुठेही पांढरा पट्टा नसताना एका विशिष्ट इमारतीसमोरच असा पट्टा काढण्यात आला होता. या प्रकारानंतर परिसरात चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर संबंधित पट्टीवर डांबर टाकून ती बुजवण्यात आल्याचे दिसून आले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : महाराष्ट्रात आजच फोडाफोडी होणार, आधी शिंदेंसोबत बैठक, अन् मग फुटलेले खासदार...
पट्ट्यांची आवश्यकता आता का निर्माण झाली?
स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, हा मुद्दा कोणत्याही समाजाविरोधात नसून सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारे विशेष चिन्हांकन का केले जाते, हा त्यामागील मुख्य प्रश्न आहे. काही कार्यकर्त्यांनी दावा केला की, ज्या व्यक्तींनी ही पट्टी काढण्याचे काम केले त्यांनाही त्यामागील कारणांची स्पष्ट माहिती नव्हती. पुढे स्थानिक रहिवाशांकडून ही पट्टी जैन धर्मगुरूंसाठी काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र याच पार्श्वभूमीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की, यापूर्वी अनेक वर्षे धर्मगुरू या भागात येत होते, मग अशा प्रकारच्या पट्ट्यांची आवश्यकता आता का निर्माण झाली? सार्वजनिक रस्त्यांवर कोणत्याही एका घटकासाठी वेगळी व्यवस्था केली जात असेल तर त्याबाबत स्पष्ट नियम आणि परवानग्या आहेत का, याबाबतही विचारणा करण्यात आली.
हेही वाचा : 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर ओमराजेंचं मौन, आहेत तरी कुठे?
या प्रकरणात मराठी संघटनांनी आपण कोणत्याही समाजात तेढ निर्माण होऊ नये याची काळजी घेत असल्याचे सांगितले. स्थानिक रहिवाशांना किंवा संबंधित कुटुंबांना त्रास होऊ नये म्हणून माध्यमांनीही संयमाने भूमिका घ्यावी, असे मत काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. त्याचवेळी काहींनी प्रशासनावर टीका करत, अशा प्रकारच्या गोष्टी सुरुवातीलाच थांबवल्या असत्या तर हा वाद वाढला नसता, असे म्हटले. सार्वजनिक रस्त्यांवर वेगवेगळ्या कारणांसाठी करण्यात येणाऱ्या बदलांवर प्रशासनाने समान निकष लावले पाहिजेत, अशी मागणीही करण्यात आली. मराठी समाजाशी संबंधित प्रश्नांमध्ये आणि इतर बाबींमध्ये वेगवेगळे निकष वापरले जात असल्याचा आरोपही काही कार्यकर्त्यांनी केला.
या वादात स्थानिक महिलांनीही सहभाग घेत आपली भूमिका मांडली. अनेक वर्षे या परिसरात विविध धर्म, भाषा आणि समुदायातील लोक एकत्र राहत असल्याचे सांगत, अचानक अशा प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्यांची गरज का निर्माण झाली याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. सार्वजनिक जागांचा वापर करताना सर्वांनी परस्परांच्या भावना आणि परंपरांचा आदर राखला पाहिजे, असे मतही व्यक्त करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणामुळे केवळ गिरगाव किंवा ठाकूरद्वारच नव्हे तर राज्यातील इतर भागांमध्येही अशा प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्यांविषयी चर्चा सुरू झाली आहे. मात्र या संपूर्ण विषयाकडे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण न करता सामंजस्याने पाहिले जावे आणि प्रशासनानेही याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT











