बंदी असताना महाराष्ट्रात गुटखा कसा काय मिळतो? तुकाराम मुंढेंनी थेट कारण सांगितलं..

मुंबई तक

16 Jul 2026 (अपडेटेड: 16 Jul 2026, 09:09 AM)

tukaram mundhe on illegal gutkha supply network : महाराष्ट्रात 2012 पासून गुटख्यावर बंदी असतानाही तो बाजारात कसा पोहोचतो, यामागील संपूर्ण साखळी तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केली. गुटखा लॉबीवर कठोर कारवाईसोबतच नागरिकांनीच सेवन थांबवल्यास हा व्यवसाय संपुष्टात येईल, असे त्यांनी सांगितले.

tukaram mundhe on illegal gutkha supply network

tukaram mundhe on illegal gutkha supply network

Google CTA

बातम्या हायलाइट

point

गुटखा बंदी असताना कसं काय मिळतो?

point

तुकाराम मुंढेंनी थेट कारण सांगितलं..

tukaram mundhe on illegal gutkha supply network : महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधी तंबाखूवर 2012 पासून बंदी लागू असतानाही राज्यभरात त्याची विक्री सुरूच असल्याचा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. याच मुद्द्यावर बोलताना अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुटखा बंदी असूनही तो बाजारात कसा पोहोचतो, यामागील कारण स्पष्ट केले. त्यांच्या मते, गुटख्याच्या अवैध व्यापारामागे मोठे नेटवर्क कार्यरत असून त्यांना रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरही विचारमंथन सुरू आहे. फूड सेफ्टी कमिशनरला कायद्यातील कलम 30 अंतर्गत अशा उत्पादनांवर बंदी घालण्याचे अधिकार असून, प्रत्येक राज्याने याबाबत निर्णय घ्यायचा असतो. नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व राज्यांनी गुटख्यावर बंदी कायम ठेवण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

हेही वाचा : Weather Report: महाराष्ट्रात पावसाचा अचानक ब्रेक, वरूणराजा बरसणार की नाही? मान्सूनबाबत IMD चा मोठा अंदाज

गुटखा तस्करीचं रॅकेट काम कसं करतं? वाहतूक कधी होते? 

मुंढे यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात गुटख्याचे उत्पादन, उत्पादन प्रक्रिया, वाहतूक, साठवणूक आणि विक्री या सर्व बाबींवर बंदी आहे. कुठे उत्पादन होत असेल तर ते लपून केले जाते. आपल्याला माहिती मिळाली की, लगेच आपण कारवाई करतो. त्यामुळे राज्यात अधिकृत उत्पादन होत नसले तरी अवैध मार्गाने गुटखा राज्यात आणला जातो. त्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी मोठ्या ट्रकमधून गुटखा आणला जात होता. मात्र कारवाई वाढल्यानंतर आणि मकोकासारख्या कठोर कायद्यांचा वापर सुरू झाल्यानंतर तस्करांनी आपली पद्धत बदलली आहे. गोडाऊन राज्याच्या बॉर्डरच्या पलिकडे शिफ्ट केले गेले. ट्रकऐवजी आता लहान वाहनांमधून, विशेषतः रात्रीच्या वेळी गुटख्याची वाहतूक केली जाते आणि सकाळी विविध ठिकाणी त्याचे वितरण केले जाते. जिल्हा, तालुका आणि शहर स्तरावर समन्वयक नेमून संपूर्ण वितरण व्यवस्था उभी करण्यात आली असून हे समांतर नेटवर्क मोडून काढण्यासाठी सातत्याने कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Personal Finance: लग्नासाठी सोने खरेदी करताना लाखो रुपये कसे वाचवाल? 'या' आहेत 10 गोल्डन टिप्स!

गुटखा लॉबीला महाराष्ट्रात स्थान दिले जाणार नाही, कारवाई होणार - मुंढे

यापुढे केवळ अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गतच नव्हे, तर भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे लागू करून गुन्हे दाखल केले जात असल्याची माहितीही मुंढे यांनी दिली. पोलिसांच्या सहकार्याने तपास केला जात असून केवळ विक्रेत्यांवरच नव्हे तर संबंधित ब्रँड आणि त्यामागील संपूर्ण साखळीला गुन्ह्यात सहभागी केले जात आहे. मोकाअंतर्गत काही प्रकरणांची तयारी अंतिम टप्प्यात असून, येत्या काही दिवसांत अशा प्रकरणांची नोंद होईल, असेही त्यांनी सांगितले. गुटखा लॉबीला महाराष्ट्रात स्थान दिले जाणार नाही आणि आवश्यक असेल तर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

गुटखा बंदीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सेवनच बंद करणे - तुकाराम मुंढे 

यासोबतच मुंढे यांनी नागरिकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. त्यांच्या मते, गुटखा बंद करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचे सेवनच बंद करणे. मागणी संपली तर पुरवठाही आपोआप थांबेल. व्यसनामुळे काही दिवस त्रास होऊ शकतो, मात्र समुपदेशन आणि व्यसनमुक्तीच्या माध्यमातून त्यावर मात करता येते, असे त्यांनी सांगितले. विशेषतः ग्रामीण भागात तरुणांमध्ये वाढणारे व्यसन, तोंडाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम लक्षात घेता नागरिकांनी स्वतःहून गुटखा सोडण्याचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाकडून नियमन आणि कारवाई सुरूच राहील, मात्र समाजानेही हे व्यसन स्वीकारार्ह नाही, अशी भूमिका घेतली तरच गुटख्याचे अवैध बाजार पूर्णपणे बंद होऊ शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले.