Mumbai News : सोमवारी (13 जुलै) एका एसी लोकलमध्ये कुलिंग सिस्टीम बंद पडल्याने अचानक तीन प्रवाशांची तब्येत बिघडली. टिटवाळा-सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या या एसी लोकलची कुलिंग सिस्टीम बंद पडली होती. जवळपास 16 मिनिटं ही सिस्टीम बंद असल्यानं हा प्रकार घडला. त्यानंतर मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार मध्य रेल्वेने एसी लोकल गाड्यांसाठी तातडीने एक नवीन कार्यप्रणाली (प्रोटॉकॉल) लागू केली आहे.
ADVERTISEMENT
काय आहे नवा निर्णय?
या नव्या निर्णयाविषयी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या नव्या नियमांनुसार, प्रवासादरम्यान जर एखाद्या एसी लोकलच्या कुलिंग सिस्टीममध्ये बिघाड झाला, तर प्रवाशांना तात्काळ पुढच्याच स्थानकावर उतरवले जाईल. त्यानंतर ती लोकल सेवा खंडित करून पुढील तपासणी आणि दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये पाठवली जाईल. या नव्या नियमावलीची माहिती सर्व मोटरमनना देण्यात आली आहे.
हे ही वाचा : Devendra Fadanvis : '48 हजार कोटी रूपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे बिल माफ', मुख्यमंत्र्यांची घोषणा
कुलिंग सिस्टीम बंद पडण्याचे कारण काय?
टिटवाळा-सीएसएमटी एसी लोकलच्या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रेन सुरू असताना रेल्वे ट्रॅक्शन सुपरवायझरला संबंधित डब्यामध्ये पोहोचता आले नाही. यामुळे धावत्या ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाडाची जागेवरच तपासणी करणे अशक्य झाले. ही लोकल कारशेडमधून बाहेर पडली तेव्हा तिच्यात कोणताही दोष आढळला नव्हता, मात्र प्रवासादरम्यान अचानक हा तांत्रिक बिघाड उद्भवला. दिवा स्टेशन ओलांडल्यानंतर ट्रेनमधील एसी यंत्रणा बंद पडली होती, तरीही ती तशाच अवस्थेत पुढील 16 मिनिटं मुलुंड स्थानकापर्यंत धावत राहिली.
हे ही वाचा : मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला भीषण आग, Video व्हायरल
दरवाजे उघडे ठेवून गाडी चालवली
लोकलमधील एसी बंद झाल्यामुळे डब्यात हवा खेळती राहिली नाही आणि गुदमरल्यासारखे होऊन तीन प्रवाशांची प्रकृती खालावली. यानंतरच ही ट्रेन थांबवण्यात आली. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आणि खेळती हवा मिळण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी मुलुंड ते कुर्ला दरम्यान लोकलचे दरवाजे उघडे ठेवून गाडी चालवली. यानंतर कुर्ला स्थानकावर प्रवाशांना उतरवून ही ट्रेन पुढील सखोल तपासणीसाठी सेवेतून तात्काळ मागे घेण्यात आली.
ADVERTISEMENT












