Mumbai Crime : मुंबईतील साकीनाका परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका 55 वर्षीय व्यक्तीने मांजरावर अमानुष कृत्य केल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी सुलेमान सोनी (वय 55) याच्याविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा तसेच इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 7 नोव्हेंबर रोजी उघडकीस आला.
ADVERTISEMENT
शेजारच्या व्यक्तीला आवाज आल्याने उघडकीस आला प्रकार
तक्रारदार तौफिक शेख (वय 23) हे संघर्षनगर, साकीनाका येथे राहतात. ते घरात नाश्ता करत असताना त्यांचा मित्र गणेश सावंत धावत येत घाबरलेल्या आवाजात म्हणाला की, शेजारच्या प्रगती सोसायटीतील एका खोलीतून मांजराचा विचित्र, वेदनादायक आवाज येत आहे. सुरुवातीला तौफिक यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही, परंतु काही वेळातच त्यांनाही तोच आवाज ऐकू येऊ लागल्याने ते सावंतसोबत त्या ठिकाणी गेले. घटनास्थळी पोहोचल्यावर तौफिक यांनी पाहिले की, सुलेमान सोनी हा मांजराला पकडून त्याच्यावर अतिप्रसंग करत होता. हे दृश्य पाहून ते हादरले. त्यांनी ताबडतोब त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी तिथून पळून गेला. त्यानंतर तौफिक यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
हेही वाचा : 'फडणवीस साहेब तेव्हा साफ खोटं बोलले...', गुवाहटीच्या 'त्या' फोनबाबत बच्चू कडूंचा खळबजनक खुलासा
काही वेळातच साकीनाका पोलिस ठाण्याचे बीट मार्शल सुशांत जाधव घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी सोनीला शोधून ताब्यात घेतले. त्याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, जखमी मांजराला तौफिक शेख आणि त्यांच्या मित्रांनी तत्काळ जोगेश्वरी येथील वर्ल्ड फॉर ऑल या प्राणी रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्राणीप्रेमी आणि नागरिकांनी या अमानुष घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
या प्रकरणाने पुन्हा एकदा प्राण्यांवरील अत्याचाराचा प्रश्न गंभीरपणे पुढे आला आहे. समाजात अशा विकृत प्रवृत्तीच्या घटनांविरोधात कायद्याने अधिक कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











