navi mumbai municipal hospital negligence : नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील कथित वैद्यकीय हलगर्जीपणाचे प्रकरण आता राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरले आहे. चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे दोन गर्भवती महिलांचा मृत्यू झाल्याचा, तर आणखी एका गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांत या घटना घडल्याचा दावा करण्यात येत असून, या प्रकरणामुळे महापालिका प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या आरोपांनंतर रुग्णालयाच्या कामकाजावर आणि संबंधित यंत्रणेवर टीकेची झोड उठलीये. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा नादखुळा टीझर, हिरोच्या भूमिकेनं ताणली उत्सुकता; चित्रपट प्रदर्शनाची तारीख समोर
मनसेचं नवी मुंबई महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन
या कथित वैद्यकीय हलगर्जीपणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी मुंबई महानगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडले. मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे आपल्या कार्यकर्त्यांसह महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांची भेट घेण्यासाठी महापालिका कार्यालयात पोहोचले. यावेळी चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे दोन गर्भवती महिलांचा मृत्यू झाल्याचा आणि आणखी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही मनसेकडून करण्यात आली.
हेही वाचा : 'तू जाड आहेस, तुला बाळही होत नाही', पतीकडून पत्नीची क्रूरपणे हत्या
महिला आरोग्य अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
आंदोलनादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. त्यांनी अंगावरील शर्ट काढून आंदोलन करत या आंदोलनाला 'कपडे उतारा आंदोलन' असे नाव दिले. या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाने एका महिला आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित केल्याची माहिती समोर आली. या कारवाईनंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले असले, तरी या प्रकरणातील इतर जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी कायम ठेवण्यात आली आहे.
मनसेच्या नेत्यांनी केवळ एका अधिकाऱ्याला निलंबित करणे पुरेसे नसल्याचे स्पष्ट केले आहे. या कथित वैद्यकीय हलगर्जीपणासाठी जे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असतील, त्या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. संबंधित सर्व दोषींवर कारवाई झाली नाही, तर येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. एका अधिकाऱ्याच्या निलंबनानंतर सध्या आंदोलन थांबले असले, तरी संपूर्ण प्रकरणातील सर्व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याच्या मागणीवर मनसे ठाम असून, यापुढे महापालिका प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












