ulhas river bullet train temporary bridge viral claim fact check : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उल्हास नदीवरील पूल वाहून गेल्याचा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मात्र हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) स्पष्ट केले आहे. DGIPR च्या फॅक्ट चेकमध्ये व्हायरल व्हिडिओतील संरचना ही बुलेट ट्रेनचा कायमस्वरूपी पूल नसून प्रकल्पाच्या कामासाठी उभारण्यात आलेला तात्पुरता बांधकाम पूल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचा मुख्य पूल वाहून गेला असल्याचा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांच्या कंपनीवर FDA ची मोठी कारवाई
वाहून गेलेला पूल कायमस्वरूपी बुलेट ट्रेनच्या रेल्वे पुलाचा भाग नव्हता
DGIPR ने दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी संरचना ही बांधकामासाठी लागणारे साहित्य, यंत्रसामग्री आणि कामगारांची वाहतूक करण्यासाठी उभारण्यात आलेला तात्पुरता प्रवेश पूल होता. हा पूल ठाण्यातील दिवा परिसरात उल्हास नदीवर उभारण्यात आला होता. 4 ते 6 जुलैदरम्यान मुंबई महानगर प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा तात्पुरता बांधकाम पूल वाहून गेला. मात्र हा पूल कायमस्वरूपी बुलेट ट्रेनच्या रेल्वे पुलाचा भाग नव्हता. कायमस्वरूपी पुलाचे बांधकाम अद्याप सुरू असून त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : ये रे ये रे पावसा.., ऐन जुलै महिन्यात पाऊस गेला कुठे? 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट
पावसामुळे तात्पुरत्या प्रवेश संरचनेवर परिणाम झाला असल्याची पुष्टी
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) नेही या घटनेबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. मुसळधार पावसामुळे तात्पुरत्या प्रवेश संरचनेवर परिणाम झाला असल्याची पुष्टी करताना, या घटनेमुळे प्रकल्पाच्या कामाच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे सांगण्यात आले आहे. तात्पुरती संरचना कोसळली असली तरी प्रकल्पाचे बांधकाम किंवा नियोजन यामध्ये कोणताही विलंब झालेला नाही. तसेच ही संरचना वाहून गेली त्यावेळी तेथे कोणताही कामगार उपस्थित नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पाया 2017 मध्ये ठेवण्यात आला होता. हा 508 किलोमीटर लांबीचा भारतातील पहिला बुलेट ट्रेन मार्ग असून त्यामध्ये मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या 12 स्थानकांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या प्रकल्पाची विविध नागरी कामे सुरू आहेत. दिवा येथील तात्पुरती संरचना वाहून गेल्यानंतरही प्रकल्पाचे काम नियोजित वेळापत्रकानुसार सुरू असून, आवश्यक असल्यास तात्पुरत्या प्रवेश संरचनेची पुनर्बांधणी करण्यात येईल. त्यामुळे या घटनेचा बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामावर किंवा वेळापत्रकावर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे DGIPR आणि NHSRCL यांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT












