Ketan Agarwal Murder Case : लोहगड किल्ल्यावर पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यूचे प्रकरण सुरुवातीला दुर्दैवी ट्रेकिंग अपघात म्हणून समोर आले होते. मात्र तपासादरम्यान समोर आलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. 18 जून रोजी किल्ल्यावरील तिकीट काउंटरजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात केतन अग्रवाल आणि त्यांची होणारी बायको सिया गोयल चालताना दिसत होते. त्यांच्यामागे एक व्यक्ती हुडी घालून संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. काही तासांनंतर केतन यांचा मृत्यू झाला. या फुटेजमधील व्यक्तीची ओळख नंतर चेतन चौधरी अशी पटली, जो सियाचा बॉयफ्रेंड आहे. जून महिन्यात तब्बल 33 अंश सेल्सिअस तापमान असताना एखादी व्यक्ती चेहरा झाकणारी हुडी का परिधान करेल, हा प्रश्न तपास अधिकाऱ्यांना पडला आणि याच संशयातून सखोल चौकशीला सुरुवात झाली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : लग्नसोहळ्याची तयारी सुरू होती, नवरी मुलीसह आई वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, अश्लील फोटो अन्..
CCTV मध्ये हुडी घातलेल्या व्यक्तीचा चेहरा झाकलेला दिसला
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. त्यामध्ये हुडी घातलेल्या व्यक्तीचा चेहरा पूर्णपणे झाकलेला असल्याचे दिसून आले. त्याने हुडीवर हेडसेटही घातला होता. एका दुसऱ्या फुटेजमध्ये सिया गोयल मागे वळून पाहताना दिसत असून त्याच क्षणी हुडी घातलेला व्यक्ती अचानक बसल्याचे आढळले. या हालचालींमुळे संशय आणखी वाढला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 18 जून रोजी चेतन चौधरीने स्वतःचा मोबाईल फोन आपल्या दुकानातच ठेवला होता, जेणेकरून त्याचे लोकेशन ट्रॅक होऊ नये. त्याने एका कर्मचाऱ्याचा फोन वापरल्याचा संशय आहे. याशिवाय सकाळी 7 ते सायंकाळी 5.40 वाजेपर्यंत त्याच्या मोबाईलवरील इंटरनेट सेवा बंद होती. त्या दिवशी त्याच्या क्रमांकावर आलेल्या कॉल्सना स्वतः चेतनने उत्तर दिले नसून दुकानातील कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याचेही तपासात समोर आले.
हेही वाचा : केतनने एखाद्या राजकुमारीप्रमाणे जपलं, शेवटी सियाने थंड डोक्याने दगा दिला, फोटो व्हायरलं!
सियाने स्वत:च पोलिसांना फोन करुन सांगितलं
पोलिसांच्या तपासानुसार, सिया गोयलचा किल्ल्यावरील खोल दरीजवळ पोहोचल्यानंतर चेतन चौधरी त्यांच्यामागून आला. त्यानंतर केतन सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळला आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर सिया गोयलने लोणावळा ग्रामीण पोलिसांना फोन करून तिचा होणारा नवरा फोटो काढताना तोल जाऊन पडल्याचे सांगितले. जोरदार वाऱ्यामुळे हा अपघात घडल्याचा दावा तिने केला होता. त्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 19 जून रोजी बचाव पथकाने कठीण मोहिम राबवत केतन यांचा मृतदेह बाहेर काढला. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. मात्र सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.
यानंतर पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड आणि डिजिटल पुरावे गोळा केले.. तपासात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात 2 हजार पेक्षा जास्त कॉल्स झाल्याचे समोर आले. दोघांमध्ये हजारो फोन कॉल्स झाल्याचे आणि अनेक संभाषणे तासंतास चालल्याचे पोलिसांनी सांगितले. तांत्रिक तपासातून दोघांमधील घनिष्ठ संबंध आणि कट रचल्याचा संशय अधिक बळकट झाला. पोलिसांच्या मते, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात संबंध होते आणि सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. केतन आणि सिया यांचा फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला होता आणि नोव्हेंबरमध्ये उदयपूर येथे त्यांचा विवाह होणार होता. तपासादरम्यान केतनच्या कुटुंबीयांनी सियाने यापूर्वी लग्न पुढे ढकलण्याबाबत शंका व्यक्त केल्याचे सांगितले. तसेच तिने वारंवार केतनला लोहगड किल्ल्यावर जाण्याचा आग्रह धरल्याचेही समोर आले. पोलिसांचा दावा आहे की, 18 जून रोजी आखलेली योजना अंमलात आणण्यात आली आणि केतनचा मृत्यू हा अपघात नसून नियोजित हत्येचा भाग होता. सिया गोयल आणि चेतन चौधरी सध्या पोलिस कोठडीत असून चौकशीदरम्यान त्यांनी सहभागाची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
ADVERTISEMENT











