Vaishnavi Hagawane: हगवणेंकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय... वडील कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

मुंबई तक

29 May 2025 (अपडेटेड: 29 May 2025, 07:12 PM)

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी कोर्टात युक्तिवाद करताना हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय निर्माण करत आपल्या अशीलाची बाजू मांडली होती. त्यांच्या याच युक्तिवादाबाबत बोलताना वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांना अश्रू अनावर झाले.

वैष्णवी हगवणेचे वडील कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

वैष्णवी हगवणेचे वडील कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

Google CTA

पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी काल (28 मे) कोर्टात काही खळबजनक दावे हे राजेंद्र आणि शशांक हगवणे यांच्या वकिलांद्वारे करण्यात आले. ज्यानंतर आज (29 मे) वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत वैष्णवीवर हगवणेंकडून जे आरोप करण्यात आले त्याबाबत बोलताना अनिल कस्पटेंना अश्रू अनावर झाले.

हे वाचलं का?

'माझी मुलगी तर गेलीच आहे. पण मेल्यानंतर आता तिच्यावर एवढे वाईट-वाईट शिंतोडे उडवू नका.' असं म्हणत अनिल कस्पटे हे माध्यमांसमोर अक्षरश: ढसाढसा रडले.

हे ही वाचा>> अमानुष मारहाण, मोबाईल हिसकावून पळाला.... मयुरीने CCTV दाखवले, हगवणे कुटुंबानं कसं छळलं ते सांगितलं

कस्पटेंकडून हगवणे कुटुंबीयांवर गंभीर आरोप, पाहा पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं.. 

'मी मुलीच्या लग्नाआधी एमजी हेक्टर गाडी बुक केली होती. पण हगवणेंनी माझ्याशी वाद घातला. मला म्हणाले जर ही गाडी दिली तर तिथेच सोडून देईल नाहीतर पेटवून टाकेन. मला फॉर्च्युनर गाडीच हवी असंही ते यावेळी म्हणाले. दुसरी गोष्ट अशी की, त्यांच्याकडे 5 कोटीच्या वैगरे गाड्या नाही. निव्वळ त्यांच्या कडे एकच गाडी आहे. ही जी गाडी मी दिलेली आहे ती दिलेली नाही तर ती माझ्याकडे मागितली गेली आहे. माझ्या मुलीला त्रास देऊन.. लग्नाला उभं राहणार नाही, लग्न मोडून टाकेन.. असं सांगितलं होतं.' 

'आधीच माझ्या मुलीची दोन ठिकाणी लग्न मोडली. त्यातही मला हे लग्न जबरदस्तीने करावं लागलं. त्यातही लग्नाला तयार झाल्यावर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली. माझ्याकडे सोन्याची, गाडीची मागणी.. चांदीच्या ताटाची, गौरीची मागणी केली. अधिक महिन्यात जावयाला चांदीचंच ताट पाहिजे.. या सगळ्या मागणी मी पूर्ण केल्या.'

हे ही वाचा>> Vaishnavi Hagawane Case: सुनांना मरणयातना देणाऱ्या हगवणेंचा भलताच उद्योग, बैलासमोर नाचवलेलं गौतमी पाटीलला!

'जर सून मयत आहे तर त्यांना हे कुठून सुचलं की, बाळाला दुसऱ्याकडे सांभाळायला द्यायचं. हा निलेश चव्हाण त्यावेळी तिथे कसा? ज्यावेळी माझ्या मुलीला मारलं गेलं, मग माझ्या हिशोबाने मी असाही आरोप करेन की, या कटात निलेश चव्हाण देखील सामील होता.'

'मामाच्या (जालिंदर सुपेकर) जीवावर आम्ही काहीही करु शकतो, असं हगवणे म्हणायचे.  दोन कोटी हवेत यासाठी देखील मला धमकी देऊन गेले होते.'

'सहा दिवस मारहाण केली मुलीला.. आता ते काही आरोप करतील, काही शिंतोडे उडवतील माझ्या मुलीवरच.. एखाद्या असहाय्य मुलीवर.. माझी मुलगी तर गेलीच आहे. पण मेल्यानंतर आता तिच्यावर एवढे वाईट-वाईट शिंतोडे उडवू नका. तुम्ही अशा लेकराचं असं नका करू.. एवढंच माल सांगायचंय.' असं म्हणत अनिल कस्पटे यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.