Crime News: पती आणि पत्नीच्या वादातून एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. खरंतर, प्रकरणातील पती-पत्नी त्यांच्यातील मतभेदामुळे 10 वर्षांपासून वेगळे राहत होते. पती बिहारमध्ये तर पत्नीमध्ये दिल्लीमध्ये वास्तव्यास होती. मात्र, 10 वर्षांनंतर अशी एक घटना घडली, ज्याची कोणालाच कल्पना नव्हती. अचानक एके दिवशी पती साधूच्या वेशात अगदी लपुनछपून तिच्या पत्नीकडे गेला. त्यावेळी पत्नी तिच्या पतीला ओळखूच शकली नाही. त्या रात्रीच त्याने कुटुंबियांची दिशाभूल केली आणि आपल्या पत्नीची हत्या केली. या प्रकरणामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
एक व्यक्ती 10 वर्षांपासून बिहारमध्ये आपल्या पत्नीपासून वेगळं राहत होता. अचानक एके दिवशी तो साधुच्या वेशात दिल्लीमध्ये राहणाऱ्या आपल्या पत्नीकडे गेला आणि त्या रात्रीच त्याने हातोड्याने वार करून त्याच्या पत्नीची हत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना ही घटना दक्षिण दिल्लीतील नेब सराई परिसरात घडली. प्रकरणातील आरोपी पतीचं नाव प्रमोद कुमार झा (60) आणि पत्नीचं नाव किरण असल्याची माहिती आहे. प्रमोदने बुधवारी पहाटे त्याची पत्नी किरणवर तिच्या घरात हल्ला केला आणि या हल्ल्यात पीडित पत्नीचा मृत्यू झाला. पोलिसांनी हा पूर्वनियोजित हल्ला असल्याचं सांगितलं आहे. तसेच, पीडित महिला किरणचं वय 50 वर्षे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रक्ताच्या थारोळ्यात दिसला मृतदेह
डीसीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे 4 वाजता किरणच्या सूनेने तिला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. आपल्या सासूचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहताच ती जोरात ओरडू लागली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच लगेच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, प्रमोदने कुटुंबियांची दिशाभूल करण्यासाठी साधुच्या वेशात घरात प्रवेश केला.
हे ही वाचा: फॅक्ट चेक: मराठ्यांचं साम्राज्य राजस्थानात! पुस्तकात 'तो' नकाशा, तिकडचे राजे चिडले अन्..
पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती
प्रकरणाची माहिती देताना डीसीपी म्हणाले, "आरोपी जवळपास 10 वर्षे पत्नीपासून विभक्त राहिल्यानंतर 1 ऑगस्ट रोजी बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावातून दिल्लीला गेला होता. त्याने कुटुंबातील सदस्यांची दिशाभूल करण्यासाठी आणि घरात प्रवेश करण्यासाठी साधूचा वेष धारण केल्याचा आरोप आहे." घरगुती हिंसाचाराच्या सततच्या जाचामुळे किरण गेल्या 10 वर्षांपासून तिच्या पतीपासून वेगळी राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधिकाऱ्याच्या मते, पीडित महिला तिचा मुलगा दुर्गेश, सून कमल झा आणि तिच्या नातवासोबत दिल्लीतील नेब सराई परिसरात राहत होती.
प्रकरणातील आरोपी पतीला अटक झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, अधिक काळापासून पत्नीसोबत होत असलेल्या कौटुंबिक वादातून आरोपीने हे पाऊल उचललं असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. या हत्येमुळे सर्वत्र दहशतीचं आणि भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
