Chhatrapati Sambhajinagar Crime : पैठण तालुक्यातील कडेठाण बु. येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून मुलाने स्वतःच्या वडिलांचा खून करून त्यांचा मृतदेह घरातच पुरल्याचे उघड झाले आहे. उग्र वास पसरू लागल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी हे प्रकारण उघडकीस आलयं. कल्याण काळे (वय 65) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांचा मुलगा राम काळे (38) हा या भयानक गुन्ह्यातील आरोपी आहे.
ADVERTISEMENT
भोळसर आईला जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प केलं
अधिकची माहिती अशी की, कडेठाण बुद्रुक येथे कल्याण काळे हे पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. राम आणि लक्ष्मण अशी दोन्ही मुलांची नावे असून, दोघेही अविवाहित आहेत. कुटुंबातील वातावरणात राम आणि कल्याण यांच्यात वारंवार वाद होत असत. याच पार्श्वभूमीवर 13 तारखेला दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. संतापाच्या भरात रामने तीक्ष्ण हत्याराने वार करून वडिलांचा खून केला. हा संपूर्ण प्रसंग त्यांच्या भोळसर आईच्या डोळ्यांसमोर घडला. घटनेनंतर रामने आईला धमकावत ही माहिती कुणालाही न सांगण्यास सक्त मनाई केली.
हेही वाचा : अनगर: उज्ज्वला थिटेंच्या अर्जानंतर पंडित देशमुख हत्या प्रकरण पुन्हा का आलं चर्चेत? A टू Z स्टोरी
खून लपवण्यासाठी रामने घरातच खड्डा खोदून कल्याण काळे यांचा मृतदेह पुरून टाकला. मात्र काही दिवसांनी परिसरात आणि घरातच प्रचंड दुर्गंधी येऊ लागल्याने कल्याण यांच्या पत्नीची शंका अधिकच वाढली. अखेर आठ दिवसांनी तिने हा प्रकार आपल्या दिराला सांगितला. त्यांनी तात्काळ गावचे सरपंच संभाजी तवार यांना माहिती दिली. तवार यांनीही विलंब न करता पाचोड पोलिसांना याबाबत कळवले.
माहिती मिळताच सपोनि. सचिन पंडित, पोउनि. राम बाराहाते, पोउनि. महादेव नाईकवाडे तसेच जमादार रवी आंबेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घरात खोदकाम करून पुरलेला मृतदेह बाहेर काढला. पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया घरातच पार पडली आणि रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राम काळे याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पाचोड पोलीस करत आहेत. कडेठाण बुद्रुक परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











