बाळू राऊत मशरूम आणण्यासाठी गेले अन्... अंगावर काटा आणणारी घटना, धड एकीकडे अन् 12 फुटांवर पाय.. नेमकं काय घडलं

मुंबई तक

• 03:49 PM • 24 Sep 2026

गडचिरोलीतील वसा गावाजवळ मशरूम आणि रानमेवा गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या 45 वर्षीय बाळू राऊत यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा बळी घेतला असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

gadchiroli tiger attack 45 year old worker killed in forest while collecting mushrooms

Gadchiroli tiger attack

Google CTA

व्येंकटेश दुडमवार, गडचिरोली: जंगलात रानमेवा व मशरूम (अळंबी) गोळा करण्यासाठी गेलेल्या एका 45 वर्षीय मजुरावर वाघाने भीषण हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची अत्यंत दुर्दैवी घटना गडचिरोली तालुक्यातील वसा गावाजवळील जंगल परिसरात उघडकीस आली आहे. बाळू विठ्ठल राऊत (वय 45, रा. वसा, ता. गडचिरोली) असे मृत मजुराचे नाव असून, या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात तीव्र शोककळा पसरली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे वाचलं का?

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, बाळू राऊत हे 23 सप्टेंबर रोजी सकाळी मशरूम आणण्यासाठी जवळच असलेल्या जंगल परिसरात गेले होते. मात्र, सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी रात्रीपासूनच त्यांची शोधाशोध सुरू केली. त्यांचा मोबाईल सतत बंद लागत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. सायबर सेलच्या मदतीने मोबाईलचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु फोन बंद असल्याने कोणतीही दिशा मिळाली नाही. अखेर गुरुवारी (24 सप्टेंबर) सकाळी ग्रामस्थांनी वसा परिसरातील जंगल पिंजून काढले असता, एका भयानक स्थितीत बाळू राऊत यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस व वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठले.

हे ही वाचा>> सांगली पटवर्धन घराण्याच्या वारशाचा वाद पेटला, मैनै प्यार किया फेम भाग्यश्रीने काय केलं?

घटनास्थळी थरारक दृश्य

ज्या भागात ही घटना घडली, त्या परिसरात आधीपासूनच वाघाचा वावर असल्याचे बोलले जाते. घटनास्थळावरील दृश्य अत्यंत विदारक आणि मन हेलावून टाकणारे होते. वाघाच्या हल्ल्याची भीषणता एवढी प्रचंड होती की, मजुराचे धड एका बाजूला पडले होते, तर पाय तब्बल 12 मीटर लांब अंतरावर फेकला गेला होता. मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत पाहून शोध घेण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांचा आणि ग्रामस्थांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची घटनास्थळी धाव

घटनेची गंभीर दखल घेत गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तात्काळ वसा गावात धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली आणि शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, आरमोरीचे पोलीस निरीक्षक सचिन झणक आणि वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

हे ही वाचा>> नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? पोस्ट होतायत व्हायरल

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

बाळू राऊत यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. दिवसेंदिवस गडचिरोली परिसरातील जंगलांमध्ये वन्यप्राण्यांचे हल्ले वाढत चालल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी संतप्त मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.