जालना हादरलं, पत्नी अन् 4 मुलींनी मिळून बापाला संपवलं, नेमकं काय घडलं?

Jalna Crime News : जालन्यात कौटुंबिक वादातून पत्नी आणि चार मुलींनी केली वडिलांची हत्या...जाफराबाद तालुक्यातील टाकळी येथील धक्कादायक घटना; पत्नीसह चार मुलींवर खुनाचा गुन्हा दाखल...

Jalna Crime News

Jalna Crime News

मुंबई तक

16 Jun 2026 (अपडेटेड: 16 Jun 2026, 04:47 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पत्नी अन् 4 मुलींनी मिळून बापाला संपवलं

point

जालन्यात खळबळ, नेमकं काय घडलं?

Jalna Crime News :  जाफराबाद तालुक्यातील टाकळी येथे कौटुंबिक वादातून पत्नी आणि चार मुलींनी मिळून 40 वर्षीय व्यक्तीची मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शालिकराम शिवाजी दांडगे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मयताचे सावत्र भाऊ ऋषिकेश शिवाजी दांडगे (वय 26 वर्ष) यांच्या फिर्यादीवरून जाफराबाद पोलिस ठाण्यात पत्नीसह चार मुलींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : मुंबईची खबर : 20 वर्षात असं कधीच घडलं नव्हतं, मान्सून रखडल्याने मुंबईकरांसमोर मोठं संकट

पत्नी आणि चार मुलींनी केली वडिलांची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, शालिकराम दांडगे हे लग्नानंतर सासरच्या जागेत टाकळी येथे घर बांधून पत्नी आणि मुलींसह राहत होते. काही दिवसांपासून कुटुंबात वाद सुरू होते. घटनेनंतर नातेवाइकांनी फोन करून ऋषिकेश दांडगे यांना शालिकराम यांच्या मृत्यूची माहिती दिली. त्यानंतर ते टाकळी येथे पोहोचले असता शालिकराम यांचा मृतदेह जाफराबाद ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. पोलिस पंचनाम्यादरम्यान मृतदेहाची पाहणी केली असता, शालिकराम यांच्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांवर, मनगटाजवळ तसेच शरीराच्या विविध भागांवर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. दोन्ही गुडघे आणि खुब्यांवर निळसर व्रण होते, तर जखमांमधून रक्तस्त्राव झाल्याचेही दिसून आले. 

हेही वाचा : नगरसेवकांसाठी मोठी बातमी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय

दरम्यान, घटनेच्या 15 ते 20 दिवसांपूर्वी शालिकराम दांडगे हे आपल्या मूळ गावी पद्मावती येथे आले होते. त्यावेळी पत्नी आणि मुलींकडून वारंवार मारहाण होत असल्याची व्यथा त्यांनी कुटुंबीय आणि गावकऱ्यांसमोर मांडली होती. तसेच, दोन-तीन महिन्यांपूर्वी अंगावर उकळते पाणी, तिखट आणि मीठ टाकून फेकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. "त्या मला एक दिवस मारून टाकतील," अशी भीतीदेखील त्यांनी व्यक्त केली होती. 

दरम्यान, या प्रकरणात पत्नी कोकिळा शालिकराम दांडगे (वय 38 वर्ष), मुलगी नेहा किरण तारू (वय 25 वर्ष, रा. अंधारी), कोमल शालिकराम दांडगे (वय 20 वर्ष) तसेच दोन अल्पवयीन मुलींचा समावेश असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास जाफराबाद पोलिस करत आहेत.