Maharashtra Monsoon Update : नैऋत्य मान्सूनने सुरुवातीला वेगवान वाटचाल केली असली तरी, सध्या महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती पूर्णपणे थांबली आहे. तळ कोकण आणि गोवा व्यापल्यानंतर मान्सून पुढे सरकायला तयार नाही. सध्या मान्सूनची पुढील वाटचाल केवळ आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालच्या दिशेने सुरू आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 15 ते 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणे अपेक्षित असताना, 15 तारीख उलटूनही मान्सून अद्याप कोकण किनारपट्टीवरच स्थिरावलेला आहे. महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्यासाठी आवश्यक असलेली अरबी समुद्रातील वाऱ्यांची स्थिती सध्या अनुकूल नाही.
ADVERTISEMENT
'पेरणीची घाई करु नये'
हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात मान्सूनला पुढे ढकलण्यासाठी कोणतेही चक्रीय वातावर (सायक्लोनिक सर्क्युलेशन) किंवा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले नाही. यामुळे बाष्पयुक्त वारे तितकेसे प्रभावी ठरत नसल्याने महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली आहे. आता 18 जूननंतरच राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तोपर्यंत राज्यात प्रामुख्याने उष्ण आणि दमट हवामान (Hot and Humid) राहणार असून, शेतकऱ्यांनी पावसाची शाश्वती असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा विलंब, 'या' जिल्ह्यांत उष्णतेचा व्हेव्ह; काही जिल्ह्यांना यलो अलर्ट
'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट
पुढील दोन ते तीन दिवसांसाठी हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी केला आहे. यामध्ये प्रामुख्याने उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा देण्यात आला असून तापमानात सरासरीपेक्षा 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, संभाजीनगर, जालना आणि विदर्भातील अमरावती, अकोला, वर्धा या जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणि वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा : Personal Finance: 'ही' कागदपत्रं नसतील तर चुकूनही खरेदी करू नका Resale Flat!
वाट पहावी लागणार...
येत्या मंगळवार आणि बुधवारी राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता असली तरी तो मान्सूनचा पाऊस नसेल. कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे स्थानिक स्तरावर ढग तयार होऊन गडगडाट अन् वादळासह (Thunderstorm) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. असा पाऊस प्रामुख्याने नाशिकचा घाट परिसर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी होईल. मात्र, हा मान्सूनपूर्व किंवा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असल्याने उष्णता लगेच कमी होणार नाही. त्यामुळे तूर्तास तरी संपूर्ण महाराष्ट्राला दमदार मान्सूनच्या पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ADVERTISEMENT











