Thane Crime : ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका उच्चभ्रू हाऊसिंग सोसायटीमधील फ्लॅटमध्ये 40 वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला आहे. महिलेच्या शरीरावर चाकूने सपासप वार करण्यात आले असून, आरोपीने अत्यंत क्रूरपणे ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. बुधवारी (25 मार्च) संध्याकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासचक्र फिरवली आहेत.
ADVERTISEMENT
ज्या फ्लॅटमध्ये काम करायची तिथेच आढळला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला ज्या फ्लॅटमध्ये काम करायची, त्याच फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी फ्लॅट सील केला असून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. प्राथमिक तपासणीतच हा हत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या हत्येमुळे सोसायटीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हे ही वाचा : दुर्गा देवीच्या यात्रेत 3 वर्षाच्या चिमुरडीला बघून अज्ञात व्यक्ती नराधम झाला, मंदिरामागे नेत केले शोषण, रक्ताने माखलेली पँट...
फ्लॅटमध्ये राहतात दोन पुरुष
या प्रकरणातील सर्वात संशयास्पद बाब म्हणजे, ज्या फ्लॅटमध्ये ही हत्या झाली तिथे दोन पुरुष वास्तव्यास होते. धक्कादायक म्हणजे, मृत महिला आणि त्या फ्लॅटमध्ये राहणारे दोघेही पुरुष, या तिघांकडेही घराच्या चाव्या होत्या. यामुळे बाहेरून कोणी व्यक्ती घरात घुसली की परिचयातीलच कोणाचे हे कृत्य आहे, याबाबत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून, अहवालानंतरच मृत्यूची नेमकी वेळ आणि अधिक तपशील समोर येणार आहेत.
हे ही वाचा : तरुणीची मेट्रोच्या ट्रॅकवर उडी..., प्रवाशांमध्ये मोठी खळबळ; पुढे काय घडलं?
लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळू
पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास लूटमार, जुना वाद किंवा वैयक्तिक वाद अशा सर्व बाजूंनी करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली जात असून, घटनेच्या वेळी फ्लॅटमध्ये कोणाची ये-जा होती, याचा शोध घेतला जात आहे. "आम्ही सर्व पुराव्यांची साखळी जोडत असून लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळू," असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या क्रूर हत्याकांडामागचे नेमके कारण काय होते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT











