Pune Accident : शिरूर तालुक्यातील बोऱ्हाडेमळा परिसरात पुणे–अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी दुपारी एक धक्कादायक अपघात झालाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडीज कारने चार वर्षीय बालिकेला जोरदार धडक दिली. या घटनेचा स्पष्ट सीसीटीव्ही फुटेजही समोर आला असून स्थानिकांमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
अपघातात जखमी झालेल्या बालिकेचं नाव शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय 4) असं असून ती रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. आमदार कटके यांच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज (MH 12 1391) वाहनाने वाघोलीहून शिरूरकडे प्रचारासाठी येत असताना बालिकेला धडक दिल्याची माहिती आहे. धडकेची तीव्रता इतकी होती की शुभ्रा काही अंतरावर फेकली गेल्याचे फुटेजमध्ये दिसून आले.
घटनेनंतर परिसरातील नागरिक तात्काळ मदतीला धावून आले. त्यांनी जखमी बालिकेला त्वरित शिरूरच्या वात्सल्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारांसाठी तिला पुण्यातील केएम हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे बालिकेचा जीव वाचल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दरम्यान, आमदार ज्ञानेश्वर कटके यांनीही या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्वतःच बालिकेला रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं. “घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मुलीला त्वरित उपचार मिळावेत म्हणून आम्ही स्वतः पुढाकार घेतला. सध्या तिची प्रकृती स्थिर असून तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
अपघाताची बातमी समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये महामार्गावरील बेफिकीर वाहनचालकांविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनं वेगाने धावल्यास सामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याची टीका होत आहे.
पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली. सुदैवाने बालिकेची प्रकृती स्थिर असली तरी अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी वाहतूक व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











