Vasai wedding violence dowry dispute : वसईतील एका विवाहसोहळ्यानंतर निर्माण झालेल्या वादाने अत्यंत गंभीर वळण घेतले असून, आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर हिंसक रणधुमाळीत झाले आहे. वसई पश्चिमेतील स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडा संकुल परिसरात हा संतापजनक प्रकार घडला. लग्नसोहळा पार पडल्यानंतर देणं-घेणं आणि हुंड्याच्या मुद्द्यावरून वधू आणि वर पक्षांमध्ये खटके उडाले. सुरुवातीला झालेली शाब्दिक बाचाबाची इतकी विकोपाला गेली की, काही वेळातच दोन्ही बाजूचे लोक एकमेकांवर तुटून पडले. या मारहाणीचा एक लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यामध्ये दोन्ही गटांतील लोक एकमेकांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून लग्नासारख्या पवित्र सोहळ्याला गालबोट लागले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बॉयफ्रेंडच्या प्रेमात आंधळी झाली, थेट कुटुंबियांना सोडून गेली.., पण शेवटी सगळं संपलं!
नवरदेवाकडून मारहाणीची तक्रार तर वधू पक्षाकडून पॉक्सो; पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल
या हिंसक घटनेनंतर दोन्ही गटांनी माणिकपूर पोलीस ठाणे गाठले असून एकमेकांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. नवरदेवाच्या गटाकडून 15 ते 20 जणांच्या जमावाने एकत्र येत मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली आहे, तर वधूच्या गटाने अधिक गंभीर पवित्रा घेत नवरदेवाच्या गटातील सदस्यांवर पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी इरसाद गुम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाने केवळ मारहाणच केली नाही तर महिलांसह अनेक आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. या परस्पर तक्रारींमुळे पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही बाजूंच्या जबाबांची नोंद केली आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचे 3 मोठे निर्णय, राज्यातील जनतेला खास गिफ्ट
भरदिवसा मारहाण आणि धमक्यांचा थरार; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, हुंड्याच्या वादातून झालेल्या या हाणामारीत काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करण्यासाठी काठ्या आणि इतर वस्तूंचा वापर करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओमुळे पोलिसांना पुराव्यांचे संकलन करणे सोपे झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, त्यामध्ये बेकायदेशीर जमाव जमवणे, मारहाण करणे आणि धमकावणे अशा कलमांचा समावेश आहे. लग्नाच्या मांडवात सुरू झालेला हा वाद आता थेट पोलीस कोठडीपर्यंत पोहोचला आहे.
काही आरोपी ताब्यात तर काहींचा शोध सुरू; पोलिसांचा सखोल तपास
माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणात वेगाने हालचाली करत काही संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. अद्याप अधिकृतपणे अटकेची घोषणा करण्यात आली नसली तरी, तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. हुंडा आणि देण्या-घेण्यासारख्या अनिष्ट प्रथांमुळे एका कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडल्याची चर्चा सध्या वसईत रंगली आहे. पोलीस आता व्हायरल व्हिडिओ आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करत असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच थलपती विजय यांचे 3 मोठे निर्णय, राज्यातील जनतेला खास गिफ्ट
ADVERTISEMENT











