पैशांचा हव्यास ते डॉक्टरला मारहाण; दिव्या शिंदेने जे कांड केले ते वाचाच, 10 गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

मुंबई तक

28 Sep 2026 (अपडेटेड: 28 Sep 2026, 11:05 AM)

Bigg Boss Marathi fame and social media influencer Divya Shinde has been arrested : बिग बॉस मराठी फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदेला पुण्यात एका 65 वर्षीय निवृत्त सरकारी डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी तिने आपल्या साथीदारांसह डॉक्टरच्या घरात घुसून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे.

Bigg Boss Marathi fame and social media influencer Divya Shinde has been arrested

Bigg Boss Marathi fame and social media influencer Divya Shinde has been arrested

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पैशांचा हव्यास ते डॉक्टरला मारहाण

point

दिव्या शिंदेने जे कांड केले ते वाचाच, 10 गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

Bigg Boss Marathi fame and social media influencer Divya Shinde has been arrested  : पुणे पोलिसांनी 'बिग बॉस मराठी'ची माजी स्पर्धक आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे हिला एका निवृत्त सरकारी डॉक्टरांना त्यांच्याच घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. ही अत्यंत धक्कादायक घटना 24 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुण्याच्या महंमदवाडी परिसरातील न्याती हाईलँड्स येथे घडली. या हल्ल्यामध्ये 65 वर्षीय डॉ. विद्याधर गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी डॉ. विद्याधर गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून काळेपडळ पोलीस ठाण्यात दिव्या शिंदे आणि तिच्या इतर साथीदारांविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली. 

हे वाचलं का?

हेही वाचा : जालना : छकुलीचे गावातल्या परपुरुषाशी प्रेमसंबंध, प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या; अपघाताचा बनाव

दिव्या शिंदेला खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक 

सोशल मीडियावर 'सरकार' या नावाने प्रसिद्ध असलेल्या आणि दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या दिव्याला यावर्षी फेब्रुवारीमध्ये बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमधून इतर स्पर्धकांना धमकावल्याच्या आरोपावरून बाहेर काढण्यात आले होते. या ताज्या प्रकरणाची माहिती देताना काळेपडळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले की, दिव्या शिंदेला खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून तिला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा : लाईट लावण्यावरून सावत्र आईची मुलाकडून हत्या, मांडी, कंबर, छाती आणि मानेवर गंभीर जखमा

डॉ. विद्याधर यांच्याकडे तब्बल 5 लाख रुपयांची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका सार्वजनिक कार्यक्रमातून झाल्याचे समोर आले आहे. तक्रारदार डॉ. विद्याधर गायकवाड हे 2021 मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट रुग्णालयातून वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत आणि सध्या ते करुणादीप फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे सदस्य आहेत. या संस्थेने 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे 'कला आविष्कार महोत्सव' आयोजित केला होता. डॉ. गायकवाड यांचे भाऊ महेंद्र यांनी असा आरोप केला आहे की, या कार्यक्रमाला दिव्या शिंदेला कोणतेही अधिकृत निमंत्रण देण्यात आले नव्हते, तरीही ती तेथे उपस्थित राहिली आणि एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून तिने उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर, या कार्यक्रमाला केवळ तिच्यामुळे प्रसिद्धी मिळाली असा दावा करत तिने डॉ. विद्याधर यांच्याकडे तब्बल 5 लाख रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. डॉक्टर विद्याधर यांनी सुरुवातीला तिला गुगल पे (GPay) द्वारे सुमारे 50,000 रुपये पाठवले होते, मात्र तरीही तिची पैशांची मागणी सतत सुरूच होती असे महेंद्र यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे.

पैशांच्या याच सततच्या मागणीतून 24 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दिव्या शिंदे, अण्णा ढमढेरे आणि तिचे इतर काही साथीदार डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या महंमदवाडी येथील निवासस्थानी पोहोचले. तिथे त्यांनी डॉक्टरांवर लाकडी दांडका, पट्टा आणि धातूच्या भांड्याने बेदम आणि अमानुष मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता या जमावाने घरातील सामानाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आणि जर 5 लाख रुपये दिले नाहीत, तर जीवे मारण्याची धमकीही दिली. 

एफआयआरमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार, या आरोपींनी डॉक्टरांच्या मुलालाही यावेळी धमकावले. या प्राणघातक हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांना उपचारांसाठी तत्काळ सरकारी ससून रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांच्या या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दिव्या शिंदे, अण्णा ढमढेरे आणि इतरांवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) 109 (1) (खुनाचा प्रयत्न), 308 (4), 118 (1), 115 (2), 352, 351 (3), 189 (2), 191 (2), 191 (3) आणि 190 या विविध कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

गुन्हे दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी रविवारी दिव्या शिंदेला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एल. व्ही. श्रीखंडे यांच्या सुट्टीकालीन न्यायालयात हजर केले. या प्रकरणाचे गांभीर्य आणि तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन पोलिसांनी न्यायालयाकडे तिच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, दिव्याच्या वकिलांनी या अटकेला जोरदार विरोध करत युक्तिवाद केला की, तिची ही अटक पूर्णपणे बेकायदेशीर असून सर्वोच्च न्यायालयाने अटकेसंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पोलिसांकडून योग्य प्रकारे पालन करण्यात आलेले नाही. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा बेकायदेशीर अटकेचा दावा फेटाळून लावला आणि दिव्याला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या सर्व घडामोडींनंतर पोलीस आता दिव्याच्या फरार साथीदारांचा कसून शोध घेत असून या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईला वेग आला आहे.