Crime News Bihar : बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने पत्नी पोलीस कॉन्स्टेबल झाल्यानंतर आपल्यापासून दुरावल्याचा आरोप करत ती पुन्हा नांदण्यासाठी यावी, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. हंसलाल गुप्ता असे या व्यक्तीचे नाव असून, त्याची पत्नी प्रतिभा विश्वकर्मा सध्या कटिहारमधील एका पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. पत्नीने आपल्यासोबत राहण्यास नकार दिल्याचा हंसलालचा आरोप आहे. त्याने कटिहारचे पोलीस अधीक्षक परिचय कुमार यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. मात्र, पोलिसांनी हा वैवाहिक वाद असल्याचे सांगत कायदेशीर कारवाई करण्याऐवजी समुपदेशनाचा मार्ग सुचवला आहे. हंसलालला पत्नीसमवेत पुन्हा संसार सुरू करायचा असून, त्यासाठी तो पोलिसांकडून मदतीची अपेक्षा करत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : प्राध्यापकाच्या हत्येने लातूर हादरलं, बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, 2 भावांनी मिळून संपवलं
लग्नानंतर प्रतिभा हंसलालच्या कुटुंबासोबत राहू लागली
हंसलालच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यात पेट्रोल पंपावर काम करत असताना त्याची प्रतिभाशी ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि 2021 मध्ये त्यांनी लग्न केले. त्यानंतर 2024 मध्ये बिहारमधील कैमूर येथे न्यायालयात त्यांच्या विवाहाची नोंदणी करण्यात आली. लग्नानंतर प्रतिभा हंसलालच्या कुटुंबासोबत राहू लागली. हंसलालच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या नात्याला स्वीकारले होते, असा त्याचा दावा आहे. प्रतिभाने पुढील शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आपण आणि आपल्या वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी तसेच बिहार पोलीस भरती परीक्षेच्या तयारीसाठी सुमारे 8 ते 9 लाख रुपये खर्च केल्याचे हंसलालने सांगितले. त्याचे वडील ई-रिक्षा चालवतात. प्रतिभाने बिहार पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तिची कटिहार येथे नियुक्ती झाली.
हेही वाचा : वडिलांचा व्यवसाय बुडाला अन्… सुपरस्टार नाना पाटेकरांचा थक्क करणारा प्रवास, संघर्ष आणि यश!
ड्युटीवर रुजू झाल्यावर प्रतिभा आपल्यापासून दुरावूल्याचा हंसलालचा आरोप
मात्र, पोलीस प्रशिक्षणादरम्यान आणि त्यानंतर ड्युटीवर रुजू झाल्यावर प्रतिभा आपल्यापासून दुरावू लागल्याचा हंसलालचा आरोप आहे. फोन केल्यावर ती कामाचे कारण सांगत असे आणि आपण कैमूरहून कटिहारला गेल्यानंतरही भेटण्याचे टाळत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यानंतर प्रतिभाचे राहुल शर्मा नावाच्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय आल्याचा हंसलालचा दावा आहे. या कथित संबंधांचे पुरावे आपल्याकडे असल्याचेही त्याने म्हटले आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. प्रतिभाने आपण त्याला पती म्हणून कधीही स्वीकारले नसल्याचे सांगितले असून, हंसलालने हे नाते जबरदस्तीने लादल्याचा आरोप केल्याचेही त्याचे म्हणणे आहे.
या वादानंतर हंसलाल आणि त्याचे वडील कटिहारला गेले. त्यांनी पोलीस केंद्रात प्रतिभाची भेट घेऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती त्यांच्यासोबत परत येऊन राहण्यास तयार नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी कटिहारचे पोलीस अधीक्षक परिचय कुमार यांच्याकडे लेखी तक्रार दिली. तक्रारीत वैवाहिक वादाचा संबंध प्रतिभाच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत असलेल्या कथित संबंधांशी असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, पोलीस अधीक्षकांनी कॉन्स्टेबलविरोधात कायदेशीर कारवाई करण्यास नकार देत हा खासगी वैवाहिक वाद असल्याचे सांगितले. या मतभेदांवर महिला पोलीस ठाण्यात समुपदेशनाच्या माध्यमातून तोडगा काढता येऊ शकतो, असे त्यांनी ऑफ कॅमेरा सांगितले. आता समुपदेशनातून वाद मिटून आपला संसार पुन्हा सुरू व्हावा, अशी हंसलालची अपेक्षा आहे.
ADVERTISEMENT












