Crime News : एका 50 वर्षीय महिलेची तिच्या स्वतःच्या ब्युटी पार्लरमध्ये निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. रूपबनी दास असे या मृत महिलेचे नाव असून, 44 वर्षीय हल्लेखोर पंकज याने या हत्येनंतर पार्लरबाहेर स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली. पंकज हा मूळचा हरियाणा किंवा काश्मीरचा रहिवासी असल्याचे समजते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी प्राथमिक तपासात प्रेमसंबंधातून आलेल्या कटुतेमुळे हे हत्याकांड घडल्याचा संशय व्यक्त केला आहे. रूपबनी यांचे पती अनुप यांनी त्यांना दुपारी 12 : 05 च्या सुमारास पार्लरवर सोडले होते आणि त्यानंतर काही वेळातच ही घटना घडली.
ADVERTISEMENT
भरदिवसा पार्लरमध्ये कडाक्याचे भांडण आणि रक्ताचा सडा
पार्लरमधील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रूपबनी पार्लरमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळातच पंकज तिथे आला. रूपबनी यांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले, मात्र त्याने नकार दिला. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले, ज्याचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. कर्मचाऱ्याने घाबरून तातडीने रूपबनी यांच्या कुटुंबीयांना फोन करून माहिती दिली. काही वेळातच पार्लरमधून ओरडण्याचा मोठा आवाज आल्याने स्थानिक नागरिक गोळा झाले. जेव्हा नातेवाईक तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना रूपबनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांच्या गळ्यावर खोलवर जखमा होत्या आणि संपूर्ण पार्लरमध्ये रक्ताचे डाग पसरले होते, जे तिथल्या झटापटीची भीषणता स्पष्ट करत होते. ही घटना कोलकाता येथील गरिया भागातील महामायातला परिसरात घडली.
हेही वाचा : अशोक खरातच्या दहावीच्या रिझल्टची कॉपी समोर, पाहा किती विषयात नापास? कोणत्या विषयात किती मार्क? Photo
फेसबुकवरून झालेली मैत्री आणि व्यवसायानिमित्त उत्तर भारताची वारी
पोलीस तपासात असे समोर आले आहे की, रूपबनी आणि पंकज यांची ओळख काही वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. हळूहळू त्यांच्यात मैत्री वाढली, मात्र अलीकडच्या काळात त्यांच्यातील नात्यात दुरावा निर्माण झाला होता. रूपबनी यांचे काका अमरेंद्र दास यांनी सांगितले की, कुटुंबाला या मैत्रीबद्दल कल्पना होती. साधारण दोन महिन्यांपूर्वी रूपबनी आपल्या ब्युटी पार्लर व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने पंकजसोबत दिल्ली किंवा हरियाणाच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. तिथून परतल्यानंतर त्यांच्या वागण्यात कोणताही बदल जाणवला नव्हता, त्यामुळे या हत्येच्या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. प्राथमिक पुराव्यांनुसार, पंकजने रूपबनी यांची हत्या केल्यानंतर स्वतःवरही शस्त्राने वार करून जीवन संपवले आहे. पोलीस आता या प्रकरणातील तांत्रिक बाबी, विशेषतः दोघांमधील मोबाईल संभाषण आणि फेसबुक चॅट्सची तपासणी करत आहेत. व्यवसायातील भागीदारी किंवा वैयक्तिक वाद यांपैकी नेमके कशामुळे पंकजने हे टोकाचे पाऊल उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत. या निर्घृण हत्याकांडामुळे गरिया परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अशोक खरातच्या दहावीच्या रिझल्टची कॉपी समोर, पाहा किती विषयात नापास? कोणत्या विषयात किती मार्क? Photo
ADVERTISEMENT











