Crime News : सुरतमध्ये ‘दृश्यम 3’ चित्रपट पाहिल्यानंतर एका तरुणाने बिहारमधील समस्तीपूर येथे जाऊन वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला सुरतमधून अटक केली असून पत्नीला केलेल्या एका फोनमुळे त्याचा ठावठिकाणा समोर आला. रघुवीर साहनी (50) हे घराबाहेर झोपले असताना त्यांचा 26 वर्षीय मुलगा शिव शंकर याने कुऱ्हाडीने वार केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शिव शंकरचे वडिलांसोबत संबंध तणावाचे होते. कुटुंबाच्या जमिनीच्या विक्रीवरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. तसेच वडील आपल्याला आणि पत्नीला त्रास देत असल्याचा आरोपही शिव शंकरने केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने वडिलांच्या हत्येचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : "तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो ते चुकलं का?", ओमराजे MPSC च्या विद्यार्थ्यांना असं का म्हणाले?
चित्रपट पाहून 'त्या' पद्धती शिकला
शिव शंकर पत्नीसमवेत कामासाठी सुरतमध्ये राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने सुरतमधील चित्रपटगृहात ‘दृश्यम 3’ पाहिला आणि त्यानंतर वडिलांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटातील घटनाक्रम लपवण्यासाठी तयार केलेली खोटी वेळ आणि डिजिटल पुरावे टाळण्याच्या पद्धतीपासून त्याने प्रेरणा घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याने मोबाइल बंद करून सुरतहून बिहारचा प्रवास सुरू केला. तो आधी पाटणा, त्यानंतर हाजीपूरला पोहोचला. तेथून रेल्वेने पाटोरी स्थानक गाठले. संध्याकाळी स्थानकावर उतरून रिक्षाने आणि त्यानंतर सुमारे चार किलोमीटर पायी चालत तो गावात पोहोचला. मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या मागच्या दरवाजातून आत प्रवेश करून त्याने घरातील कुऱ्हाड घेतली आणि झोपलेल्या वडिलांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर तो पुन्हा पाटोरी स्थानकाच्या दिशेने निघाला.
हेही वाचा : भाडेकरु महिलेसोबत शरीरसंबंध अन् दोन भावांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट; नेमकं काय घडलं?
पोलिसांना आरोपी कसा पकडला?
मात्र, पाटोरी स्थानकावर पोहोचल्यानंतर त्याने मोबाइल सुरू करून पत्नीला फोन केला आणि पुन्हा मोबाइल बंद केला. हाच फोन पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरला. वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही शिव शंकर उपस्थित राहिला नसल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला होता. तांत्रिक तपासात हत्येच्या दिवशी त्याचा मोबाइल पाटोरी स्थानक परिसरात असल्याचे आणि त्यानंतर सुमारे 36 तासांनी सुरतमध्ये असल्याचे समोर आले. कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर पाटोरी येथून पत्नीला केलेल्या फोनची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शिव शंकरचा ठावठिकाणा शोधून त्याला सुरतमधून अटक केली. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने तपास केला असून रघुवीर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. फॉरेन्सिक तपासात हल्लेखोर हा मृताच्या परिचयातील व्यक्ती असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. चौकशीदरम्यान शिव शंकरने ‘दृश्यम’ पाहिल्यानंतर हत्येची योजना आखल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले.
ADVERTISEMENT












