Crime News : उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये 65 वर्षीय रामदीन कुशवाह यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या 17 वर्षीय नातीला आणि तिचा कथित प्रियकर विशाल याला अटक केली आहे. दोघे घरातील खाटेवर एकत्र बसलेले असताना रामदीन यांनी त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघांनी मिळून रामदीन यांची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. रामदीन यांचा मृतदेह घरामागील विहिरीत टाकण्यात आला. सुरुवातीला कुटुंबीयांनी रामदीन यांचा विहिरीत पडून अपघाती मृत्यू झाल्याचे मानले होते.
ADVERTISEMENT
12 सप्टेंबर रोजी सायंकाळी रामदीन यांची पत्नी कामावरून घरी परतली, तेव्हा रामदीन घरात नव्हते. तिने नातीकडे आजोबांबाबत विचारणा केली असता तिने आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगितले. कुटुंबीय आणि गावातील लोकांनी रात्रभर रामदीन यांचा शोध घेतला. दुसऱ्या दिवशी नातीने रामदीन विहिरीच्या दिशेने जाताना दिसल्याचे सांगितले. त्यानंतर विहिरीत शोध घेतला असता रामदीन यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर दुखापतीच्या खुणा होत्या. रामदीन यांना दारू पिण्याची सवय असल्याने ते नशेत विहिरीत पडले असावेत, असा कुटुंबीय आणि ग्रामस्थांचा सुरुवातीला अंदाज होता. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कारानंतर घरात रक्ताचे डाग दिसले अन्...
अंत्यसंस्कारानंतर घराची साफसफाई आणि कपडे धुत असताना कुटुंबीयांना नातीचे रक्ताचे डाग असलेले कपडे आढळले. याबाबत तिच्याकडे विचारणा केल्यानंतर कथित हत्येचा प्रकार समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, नातीचे विशालसोबत संबंध होते. घटनेच्या दिवशी दोघे घरातील खाटेवर एकत्र बसले असताना रामदीन यांनी त्यांना पाहिले. त्यानंतर पकडले जाण्याची आणि कुटुंबाची बदनामी होण्याची भीती दोघांना वाटली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विशालने रामदीन यांचा गळा आवळला, तर नातीने पोळ्या बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दगडाने त्यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर दोघांनी रामदीन यांचा मृतदेह घरामागील विहिरीत टाकल्याचा आरोप आहे.
कपडे आढळल्यानंतर कुटुंबीयांनी हत्येचा संशय
रक्ताचे डाग असलेले कपडे आढळल्यानंतर कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार केली. झाशी ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अरविंद कुमार यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. मृताच्या अल्पवयीन नातीसह शेजारी राहणाऱ्या विशालला आरोपी करण्यात आले. पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे अरविंद कुमार यांनी सांगितले. हत्येसाठी वापरल्याचा आरोप असलेले हत्यारही जप्त करण्यात आले आहे. चिरगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हत्येच्या परिस्थितीबाबत पुढील माहिती गोळा केली जात आहे.
ADVERTISEMENT












