Crime News : बागपत जवळील दिल्ली-सहारनपूर महामार्गावर असलेल्या काठा गावातील स्मशानभूमीच्या भिंतीजवळ एका 14 वर्षीय किशोरवयीन मुलीचा अर्धा जळालेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. 13 ऑगस्ट रोजी उघडकीस आलेल्या या घटनेत, मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मारेकऱ्यांनी मुलीच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकून आणि पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला होता. घटनास्थळी कोणताही पुरावा नसल्यामुळे पोलिसांसमोर या 'ब्लाईंड मर्डर'चे गूढ उकलण्याचे आणि मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे दुहेरी आव्हान होते. आगीमुळे लोक जमा होतील या भीतीने आरोपींनी मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेतच सोडून तिथून पळ काढला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता.
ADVERTISEMENT
600 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले
या आव्हानात्मक गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी महामार्गावरील सुमारे 600 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 2 हजारांहून अधिक वाहनांची कसून तपासणी केली. या तपासादरम्यान 12 ऑगस्टच्या रात्री 11 वाजून 41 मिनिटांनी एक नंबर प्लेट नसलेली पांढऱ्या रंगाची स्कूटी पोलिसांच्या निदर्शनास आली. या स्कूटीवर एक पुरुष, एक महिला आणि त्यांच्या पायाजवळ एक पांढऱ्या रंगाचे संशयास्पद पोते असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले होते. या धाग्यावरून तपास करत पोलीस दिल्लीतील उस्मानपूर परिसरातील शास्त्री पार्क येथे पोहोचले. तिथे अमन सागर नावाचा व्यक्ती आपली पत्नी रचना, दोन वर्षांचे बाळ आणि 14 वर्षीय परीसोबत भाड्याने राहत होता. विशेष म्हणजे, ज्या दिवशी मृतदेह सापडला त्याच दिवशी (13 ऑगस्ट) अमनने घर खाली केल्याची माहिती घरमालकाने दिल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
हे ही वाचा : मुंबई उच्च न्यायालयात याचिका, मनोज जरांगेंच्या आंदोलनावर कोर्टाने काय सांगितलं?
सीआयडी पाहून रचला कट
अमन सागर मूळचा मथुरेचा असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मथुरेत तपास सुरू केला, जिथे त्यांना या प्रकरणातील सर्वात मोठा दुवा सापडला. 17 एप्रिल 2026 रोजी मथुरा हायवे पोलीस ठाण्यात अमन विरोधात 14 वर्षीय परीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी सर्व धागेदोरे जुळवून अमन आणि त्याची पत्नी रचना यांना हातरस येथून ताब्यात घेतले व डीएनए चाचणीद्वारे मृतदेह परीचाच असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली की, परी अमनच्या बाळाला सांभाळण्यासाठी येत असे आणि त्यातूनच परी व अमन यांच्यात जवळीक वाढून शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. यावरून रचना आणि अमनमध्ये सतत वाद होत असत. याच वादातून 'क्राईम पेट्रोल' आणि 'सीआयडी' सारख्या मालिकांमधून कल्पना घेऊन या जोडप्याने परीचा गळा दाबून खून केला आणि स्कूटीवरून मृतदेह नेऊन स्मशानभूमीजवळ विल्हेवाट लावली.
हे ही वाचा : 'ठेकेदारांना बाहेर काढा' NUHM आणि BMC महिला कर्मचाऱ्यांचं आंदोलन, काय आहेत मागण्या?
नवऱ्याच्या गुन्ह्यात बायकोची साथ
केवळ 25 दिवसांत पोलिसांनी या गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा छडा लावला असला तरी, या घटनेने व्यवस्थेवर आणि समाजावर अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. एप्रिल महिन्यातच परीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मथुरा पोलिसांनी तातडीने आणि पोक्सो कायद्यांतर्गत कडक कारवाई करत तिचा शोध घेतला असता, तर कदाचित परीचा जीव वाचला असता. दुसरीकडे, रचनाने एका अल्पवयीन मुलीला सुरक्षित घरी पोहोचवण्याऐवजी किंवा पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी नवऱ्याच्या क्रूर गुन्ह्यात साथ दिल्याने तीही तितकीच दोषी ठरली आहे. आता या गुन्हेगार पती-पत्नीला तुरुंगाची हवा खावी लागणार असून, त्यांच्या या भयंकर कृत्यामुळे त्यांच्या स्वतःच्या दोन वर्षांच्या निरागस बाळाचे भविष्य मात्र अंधारात ढकलले गेले आहे.
ADVERTISEMENT












