Crime News: बिहारच्या मुजफ्फरपूर येथून ऑनर किलिंगचं एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आलं आहे. आपल्या मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे तिच्या वडिलांनी तिचा संसार उद्धवस्त केल्याचं सांगितलं जात आहे. मुलीने लव्ह मॅरेज केल्याने संतापलेल्या वडिलांनी आपल्याच जावयावर गोळी झाडून त्याची हत्या केल्याची माहिती आहे. घटनेनंतर, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. आता, या धक्कादायक घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
गोळी झाडून जावयाची निर्घृण हत्या...
संबंधित घटना ही सिवाईपट्टी पोलीस स्टेशन हद्दीतील बंगरा गावातील असून आयुष कुमार अशी मृताची ओळख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आयुष घरात एकटाच असताना हल्लेखोर अचानक त्याच्या घरात घुसले आणि त्याच्यावर गोळी झाडली. त्यानंतर, आयुष रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. गोळी झाडल्याचा आवाज ऐकून गावकरी गोळा परंतु, अंधाराचा फायदा घेत आरोपी तिथून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर, तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी एसकेएमसीएच रुग्णालयात पाठवण्यात आला. आता, घटनास्थळावरून पुरावे गोळा केले जात असून परिसरातील लोकांची चौकशी सुरू आहे.
हे ही वाचा: सरपंचाच्या मुलाचे दुसऱ्या जातीतील मुलीशी प्रेमसंबंध, आईने विरोध करताच इंग्लंडमध्ये रचला खुनाचा कट; घरी पोहोचताच काटा काढला
माहेरच्या कुटुंबियांवर पतीच्या हत्येचा आरोप
मृताची पत्नी तनु कुमारी हिने तिच्या माहेरच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. तिने थेट तिच्या आई-वडिलांवर आणि मामावर आपल्या पतीच्या हत्येचा आरोप केला आहे. तनुने सांगितलं की 15 ऑगस्ट 2024 रोजी तिने आयुषसोबत लव्ह मॅरेज केलं होतं. मात्र, तनुच्या कुटुंबियांना त्यांचं लग्न मान्य नव्हतं. लग्न झाल्यापासूनच तिला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा आरोप तनुने केला. त्या दोघांना एक 8 महिन्यांचा मुलगा असून या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा: बीड : तुला तीन मुली झाल्या, वंशाला दिवा नाही, 25 वर्षीय विवाहितेने छळाला कंटाळून आयुष्य संपवलं
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या पत्नीच्या जबाबावरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाच्या सर्व बाजूंची कसून चौकशी केली जात आहे. तसेच, आरोपींना अटक करण्यासाठी सतत छापे टाकले जात आहेत आणि लवकरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT











