चौघांकडून छळ, एक महिन्याची लेक, अस्मितानं जीव दिला, कोल्हापूर हादरलं!

मुंबई तक

• 08:29 AM • 14 Jul 2026

kolhapur woman suicide case : कोल्हापुरात अवघ्या एक महिन्याच्या मुलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच विवाहितेने गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या आई-वडिलांनी सासरच्या चौघांवर हुंड्यासाठी आणि मुलगी झाल्यामुळे छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

kolhapur woman suicide case

kolhapur woman suicide case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

चौघांकडून छळ, एक महिन्याची लेक, अस्मितानं जीव दिला, कोल्हापूर हादरलं!

point

सासरच्या चौघांवर हुंड्यासाठी आणि मुलगी झाल्यामुळे छळ केल्याचा गंभीर आरोप

kolhapur woman suicide case : कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात अवघ्या एक महिन्याच्या मुलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अस्मिता प्रतीक सिंह काटकर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घरात मुलीच्या बारशाची तयारी सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : Exclusive: ...तर थेट जन्मठेप! तुकाराम मुंढेंचा मोठा इशारा, दूधात भेसळ करायचा विचार विसरून जा!

सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप

दरम्यान, अस्मिताच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अस्मिताचा सासू, सासरा, पती आणि नणंद या चौघांकडून सातत्याने मानसिक आणि आर्थिक छळ केला जात होता. मुलीला माहेरील नातेवाईकांशी बोलण्यासही निर्बंध घालण्यात आले होते. आई-वडिलांशी थेट संपर्क साधण्यास मज्जाव करण्यात आला होता, असा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा : ‘तो रवी उगवला नाही’ विरुद्ध ‘सूर्याकडे थुंकू नका.. ', डॉक्टर मारहाण प्रकरणावरून डोंबिवलीत नवा राजकीय राडा

लग्नानंतर विविध कारणांसाठी वारंवार पैशांची मागणी

अस्मिताच्या आई-वडिलांनी सांगितले की, लग्नानंतर विविध कारणांसाठी वारंवार पैशांची मागणी करण्यात येत होती. सातव्या महिन्यातील समारंभासाठी त्यांनी अडीच लाख रुपये खर्च केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच मुलीच्या बारशासाठी 52 हजार रुपयांचा पाळणा ऑनलाईन मागवण्यात आला होता. त्यासाठीही पैशांचा तगादा लावला जात होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाळण्यासाठी त्यांनी 40 हजार रुपये दिले होते. सासरच्या मंडळींनी मुलगा होईल या अपेक्षेने आधीच मुलाचे कपडे खरेदी करून ठेवले होते. मात्र मुलगी झाल्यानंतर अस्मिताचा छळ वाढला. मुलगा व्हावा अशीच अपेक्षा व्यक्त केली जात होती आणि त्याच कारणामुळे मुलीला मानसिक त्रास दिला जात होता, असा गंभीर आरोप अस्मिताच्या वडिलांनी केला आहे.

मानसिक आणि आर्थिक छळ होत असल्याचे तपासात समोर

अस्मिताच्या आई-वडिलांनी हा प्रकार आत्महत्या नसून आपल्या मुलीचा बळी गेल्याचा आरोप करत सासरच्या चौघांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेतली असून सासू, सासरा, पती आणि नणंद यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणात हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान अस्मिताकडे वारंवार पैशांची मागणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत माहेरकडून सुमारे पाच लाख रुपये दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतरही मुलीच्या बारशाचा आणि इतर कार्यक्रमांचा खर्च म्हणून आणखी पैशांची मागणी सुरू होती. मुलगी झाल्यामुळे तिचा मानसिक आणि आर्थिक छळ होत असल्याची बाबही तपासात समोर आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

साधारण वर्षभरापूर्वीच अस्मिताचे लग्न झाले होते. सासरची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही पैशांसाठी सातत्याने मागणी होत असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. अवघ्या एक महिन्याच्या मुलीला मागे ठेवून अस्मिताने आत्महत्या का केली, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिताच्या गळ्यावर काही जखमा आढळल्या असून विसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे एक महिन्याचे बाळ आईविना पोरके झाले असून संपूर्ण कोल्हापूर हादरून गेले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.