Mumbai Crime : मुंबईत भ्रष्टाचारविरोधी पथकाने (ACB) लाचखोरीविरोधात कारवाई करत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) एका कनिष्ठ अभियंत्यासह कर्मचाऱ्याला अटक केली आहे. बेकरी मालकाकडून 60 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, कारवाईदरम्यान BMC कर्मचाऱ्याच्या ताब्यातून तब्बल 2 लाख 78 हजार 420 रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कनिष्ठ अभियंता नीरव कुमार आणि महानगरपालिका कर्मचारी विजय रमेश पाटील अशी आहेत. दोघेही मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील BMC कार्यालयात कार्यरत होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सातारा : वॉशरुममध्ये अश्लील शब्द, पालकांना बोलवण्याची चर्चा अन् तरुणीची तिसऱ्या मजल्यावरुन उडी
कोणत्याही अडथळ्याशिवाय व्यवसाय चालू ठेवण्यासाठी लाचेची मागणी
या प्रकरणातील तक्रारदार बेकरीचा व्यवसाय चालवतो. त्याने दिलेल्या माहितीनुसार, विजय पाटील याने त्याच्याकडे 70 हजार रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम दिल्यास बेकरीचा व्यवसाय कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवता येईल आणि त्याच्याविरोधात कोणतीही प्रशासकीय कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर बेकरी मालकाने बुधवारी मुंबईतील ACB कार्यालयात याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीची चौकशी सुरू असताना विजय पाटील याने पुन्हा 70 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर त्याने तक्रारदाराची भेट त्याचा वरिष्ठ अधिकारी नीरव कुमार याच्याशी करून दिली.
हेही वाचा : बापाचा मुलीच्या चारित्र्यावर संशय, लेकीची हत्या करून मृतदेह घरामागे पुरला
ACB अधिकाऱ्यांनी आरोपींना पकडण्यासाठी रचला सापळा
या भेटीनंतर लाचेची रक्कम 70 हजार रुपयांवरून 60 हजार रुपये निश्चित करण्यात आली. त्यानंतर ACB अधिकाऱ्यांनी आरोपींना पकडण्यासाठी नियोजन केले. ठरल्याप्रमाणे विजय पाटील तक्रारदाराकडून 60 हजार रुपये लाच स्वीकारत असताना ACB अधिकाऱ्यांनी त्याला पकडले. त्याचवेळी नीरव कुमार यालाही त्याच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईनंतर विजय पाटील याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे 40 हजार रुपयांहून अधिक रोख रक्कम आढळून आली. तसेच त्याच्या बॅगेतून आणखी 2 लाख 37 हजार 600 रुपये मिळाले.
विजय पाटील याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेसह त्याच्याकडे एकूण 2 लाख 78 हजार 420 रुपये आढळून आले. ACB अधिकाऱ्यांनी या कारवाईदरम्यान नीरव कुमार याच्याकडून दोन मोबाइल फोन, तर विजय पाटील याच्याकडून एक मोबाइल फोन जप्त केला आहे. दोन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकरी मालकाकडून 60 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आणि ती स्वीकारल्याचा आरोप या दोघांवर आहे.
ADVERTISEMENT












