Palghar Murder Case , पालघर : पालघर शहरातील वजलीपाडा परिसरात घरात एकट्या राहणाऱ्या 61 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची घटना रविवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शोभा अनिल पंडित असे मृत महिलेचे नाव आहे. वजलीपाडा येथील तुळसी दर्शन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या राहत्या घरातील बेडरूममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. घरातील कपाट उघडे असल्याने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करून महिलेची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : "मी भारतीय नागरीक आहे अन् राहणार", ध्रुव राठीने पासपोर्ट दाखवत शेअर केला VIDEO
बेडरूममध्ये शोभा पंडित मृतावस्थेत आढळून आल्या
शोभा पंडित या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या नेहमीच्या दिनक्रमानुसार घराच्या दरवाजाबाहेर ठेवलेला दिवा त्या सकाळी घरात घेत असत. मात्र, घटनेच्या दिवशी दिवा बाहेरच असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. घरातील दिवे सुरू होते आणि पंखे सुरू असल्याचा आवाजही येत होता. नेहमीच्या दिनक्रमात झालेला बदल लक्षात आल्याने शेजाऱ्यांना संशय आला.त्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या दुसऱ्या चावीच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला. त्यावेळी बेडरूममध्ये शोभा पंडित मृतावस्थेत आढळून आल्या. घरातील कपाटही उघडे असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.
हेही वाचा : मोठी बातमी : अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सुटका, न्यायालयात काय घडलं?
परिसरात कोणाची संशयास्पद हालचाल?
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण काय? घरातून काही वस्तू चोरीला गेल्या आहेत का आणि या गुन्ह्यात कोणाचा सहभाग आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. घटनेच्या दोन दिवस आधी शोभा पंडित यांच्या घरात रंगकाम करण्यात आले होते. त्यामुळे रंगकामासाठी घरात कोण आले होते, त्यांना घराची कितपत माहिती होती आणि घटनेपूर्वी किंवा त्यानंतर परिसरात कोणाची संशयास्पद हालचाल झाली होती का, याची माहितीही पोलीस घेत आहेत. मात्र, रंगकामाचा आणि हत्येचा काही संबंध आहे का, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी सुरू केली असून, गुन्ह्याशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले. हत्येचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध शक्यतांचा तपास करत आहेत. तुळसी दर्शन इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी इमारतीत कोणाची ये-जा झाली होती का, तसेच परिसरात कोणती संशयास्पद व्यक्ती दिसली होती का, याची माहिती घेतली जात आहे. पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश गवळी यांनी चोरीच्या उद्देशाने हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले.
घरात एकट्या राहणाऱ्या महिलेची हत्या झाल्याने वजलीपाडा परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः एकट्या राहणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे अशा व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीचा शोध घेऊन हत्येमागील नेमके कारण उघड करण्याचे आव्हान पालघर पोलिसांसमोर आहे.
ADVERTISEMENT












