Pune Crime News : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीये. एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर तरुणीने मुठा नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवल्याचं समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, तरुणीने मृत्यूपूर्वी केलेल्या आरोपामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. याप्रकरणी मृत तरुणीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सोलापूर : रीलस्टार- हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीणीची आत्महत्या, आता नवऱ्याची पोस्ट व्हायरल
प्रेमसंबंध आणि फसवणुकीचा आरोप
भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, सदर तरुणीचे एका चप्पल विक्रेत्यासोबत प्रेमसंबंध होते. तरुणीने तीन महिन्यांपूर्वीच आपल्या कुटुंबीयांना या नात्याबद्दल कल्पना दिली होती आणि दोघांचे लग्न होणार असल्याचेही स्पष्ट केले होते. तिची आई देखील या नात्यासाठी सकारात्मक होती आणि तिने नातेवाईकांना लग्नाबद्दल माहिती दिली होती. मात्र, मे महिन्यात तरुणीने आपल्या भावाला मेसेज करत प्रियकराने आपली फसवणूक केल्याचे आणि वापर करून घेतल्याचे सांगितले. प्रियकराने तिला विसरून जाण्यास सांगितल्याने ती मानसिक तणावाखाली होती. या परिस्थितीवर भावाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रेमात आंधळी झालेली तरुणी आपल्या निर्णयावर ठाम होती.
हेही वाचा : बीड : सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमसंबंधांचा थरारक शेवट, नेमकं काय घडलं?
कुटुंबियांनी समजावूनही प्रेम प्रकरणातून बाहेर पडलीच नाही
या घटनेनंतर मुठा नदीपात्रात तरुणीचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली. खराडी पोलिसांचा तरुणीच्या भावाला फोन आल्यानंतर त्याला बहिणीने आत्महत्या केल्याचं समजलं. तरुणीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, प्रियकराने फसवणूक केल्यानेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, संशयित आरोपी चप्पल विक्रेत्याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. पोलीस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत. कुटुंबियांनी समजावून सांगूनही मुलीने प्रेम प्रकरणातून बाहेर न पडता, आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT











