Rajasthan Crime News : राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील बोराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक हत्याकांड समोर आले आहे. येथील श्रीरामपुरा गावात एका महिलेने आपल्याच पती, सासू, सवत आणि एका नातेवाईक तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या थरारक हत्याकांडानंतर आरोपी महिलेने पोलिसांना आणि गावकऱ्यांना फसवण्यासाठी एक मोठा बनाव रचला. घटना घडल्यानंतर ती घरात इतर महिलांमध्ये बसून जोरजोरात रडण्याचे आणि वारंवार बेशुद्ध पडण्याचे नाटक करत होती, जेणेकरून कोणालाही तिच्यावर संशय येऊ नये. मात्र, पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवत तिच्या या 'डबल रोल'चा पर्दाफाश केला आहे.
ADVERTISEMENT
कारच पेटवून दिली
या घटनेची सुरुवात श्रीरामपुरा गावातील मुख्य रस्त्यावर एका जळालेल्या कारमध्ये चार मृतदेह आढळल्याने झाली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच अजमेर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास केला असता रामसिंह चौधरी, त्यांची आई पुसी देवी, दुसरी पत्नी सुरज्ञान आणि आत्तेबहीण महिमा अशी मृतांची नावे समोर आली. सुरुवातीला हा अपघात असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता, कारण चौघांचेही मृतदेह कारमध्ये पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होते. मात्र, घटनास्थळाची परिस्थिती आणि पुरावे पाहता पोलिसांना हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय आला.
हे ही वाचा : Personal Finance: 50 हजार पगार असणाऱ्यांसाठी कार घेताना ‘एवढाच’ ठेवावा EMI, नाहीतर…
आधी धारदार शस्त्राने खून अन्...
अजमेरचे पोलीस अधीक्षक (SP) हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आधी चौघांची हत्या केली आणि नंतर हा प्रकार अपघात वाटावा यासाठी मृतदेह कारमध्ये टाकून ती पेटवून दिली. या घटनेनंतर मुख्य आरोपी आणि रामसिंहची पहिली पत्नी सुनीता घरात बसून मोठ्याने आक्रोश करत पीडित असल्याचा आव आणत होती. परंतु, पोलिसांच्या तपासात रामसिंह आणि सुनीता यांच्यात दीर्घकाळापासून कौटुंबिक वाद सुरू असल्याची माहिती समोर आली. घटनेच्या दिवशी बुधवारी संध्याकाळीही त्यांच्यात जोरदार भांडण झाले होते. हा वाद इतका विकोपाला गेला की, सुनीताने तिची मुलगी सरिता आणि एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने चौघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांना जागीच ठार केले.
हे ही वाचा : 'पेट्रोल थेट 70-80 रुपयात मिळेल', कधी काळी फडणवीसांना बजेट समजवणाऱ्या नेत्याने आता सांगितलं स्वस्त पेट्रोलचं गणित!
तिघेजण ताब्यात
हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी चौघांचे मृतदेह घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर नेले आणि रामसिंह यांच्याच कारमध्ये ठेवून कार पेटवून दिली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले होते. पुरावे, तांत्रिक विश्लेषण आणि गावकऱ्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण घटनेचा छडा लावला. पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपी सुनीता, तिची मुलगी सरिता आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस हत्येसाठी वापरलेली शस्त्रे जप्त करत असून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या क्रूर हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT











